जळगाव (प्रतिनिधी) शहरात रिक्षाचालकांची मुजोरी वाढू लागली आहे. आज रिक्षाचालकाने बेदरकारपणे रिक्षा चालवून आरटीओ इन्स्पेक्टर सुनील गोसावी यांच्या जिवस धोका उत्पन्न केला होता. मात्र, वेळीच रिक्षा थांबवण्यास भाग पाडल्याने पुढील अनर्थ टळला.
आज (दि.२४) सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास पांडे चौकामध्ये रिक्षा चालकांकडील कागदपत्रांची तपासणी आरटीओ इन्स्पेक्टर सुनील गोसावी हे करत होते. यावेळी एक खाजगी रिक्षा चालक (क्रमांक एम. एच. १९ ए. एक्स. ३८६३) हा वेगाने जात होता. यावेळी त्यास थांबण्याचे सांगितले. परंतु या रिक्षा चालकाने श्री. गोसावी यांच्या सूचनेकडे दुर्लक्ष केले व श्री. गोसावी यांच्याशी अरेरावी करत तेथून सुसाट वेगाने पळ काढला. आरटीओ इन्स्पेक्टर श्री. गोसावी यांनी पांडे चौकातून त्या रिक्षाचालकाचा पाठलाग सुरू केला असता रिक्षाचालकाने पंचमुखी मंदिर, सिंधी कॉलनी तसेच जुने जोशी कॉलनीतून सुसाट वेगात रिक्षा पळवत रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ नेली. याठिकाणी श्री. गोसावी यांनी रिक्षा चालकास रिक्षा थांबवण्यास भाग पाडून त्याच्याकडे कागदपत्रांची विचारणा केली. यावेळी रिक्षाचालकाने श्री. गोसावी यांना उलट उत्तरे देत अरेरावी केली. यानंतर श्री. गोसावी हे स्वतः रिक्षात बसले व रिक्षा एमआयडीसी पोलीस स्टेशनला घेऊन जाण्याची सूचना त्यांनी रिक्षाचालकास केली. परंतु, श्री. गोसावी हे रिक्षात बसलेले असताना रिक्षा चालकाने हायवेवरून वेडीवाकडी रिक्षा चालवत नेऊन श्री.गोसावी यांच्या जिवास धोका उत्पन्न होईल, अशा पद्धतीने रिक्षा चालवण्यास सुरुवात केली. तसेच पुलाजवळ रिक्षा आली असता मी रिक्षा पुलावरून खाली ढकलून देईन, अशी धमकी दिली. विशेष म्हणजे हा रिक्षाचालक अपंग आहे. रिक्षा पुढे गेल्यावर त्यास श्री. गोसावी यांनी त्याला मेमो दिला व पुढील कार्यवाही केली.