Home क्राईम आमिष दाखवून पावणे आठ लाखांचा गंडा; पुण्याच्या महिलेवर गुन्हा

आमिष दाखवून पावणे आठ लाखांचा गंडा; पुण्याच्या महिलेवर गुन्हा


वरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पुणे महानगरपालिकेत आरोग्य विभागात सुपरवायझर, ज्युनिअर क्लार्क आणि वार्डबॉय या पदांवर नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून वरणगाव येथील एका व्यक्तीसह त्यांच्या नातेवाईकांची ७ लाख ७९ हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पुणे येथील एका महिलेविरोधात वरणगाव पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी अतुल शिवाजीराव शेटे (वय ५८, रा. अजयनगर, वरणगाव) हे वरणगाव सीनियर कॉलेजमध्ये प्रयोगशाळा परिचर म्हणून कार्यरत आहेत. ऑगस्ट २०२३ ते मार्च २०२४ या कालावधीत पुण्याच्या आरोपी नेहा निनाद नाईक हिने फिर्यादी आणि त्यांच्या ओळखीच्या साक्षीदारांना पुणे महानगरपालिकेत रिक्त जागांवर नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवले.

आरोपी महिलेने फिर्यादी अतुल शेटे यांच्यामार्फत त्यांच्या नातेवाईकांना आरोग्य विभागात विविध पदांवर नोकरी देण्याचे आश्वासन देऊन वेळोवेळी ४ लाख ८० हजार रुपये उकळले. याव्यतिरिक्त, इतर साक्षीदारांकडून (श्रद्धा शेटे, श्रद्धा जोशी, रेणुका महाजन व विजय घोसास) आरोपीने नोकरीच्या नावाखाली २ लाख ९९ हजार रुपये परस्पर घेतले. अशा प्रकारे एकूण ७ लाख ७९ हजार रुपये घेऊनही कोणालाही नोकरी दिली नाही आणि घेतलेले पैसेही परत न करता पोबारा केला.

आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर अतुल शेटे यांनी वरणगाव पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी नेहा निनाद नाईक (रा. पुणे) हिच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पीएसआय मंगेश बेडकोळी या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.


Protected Content

Play sound