मुंबई-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा । मुंबईतील मुलुंड (पश्चिम) परिसरात मेट्रो बांधकामादरम्यान झालेल्या भीषण अपघातात उत्तर प्रदेशातील एका गावच्या सरपंचाचा मृत्यू झाला असून तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. एलबीएस रोडवरील सुरू असलेल्या मेट्रो प्रकल्पातील सिमेंटचा स्लॅब अचानक कोसळून रस्त्यावरून जात असलेल्या रिक्षा आणि कारवर आदळल्याने हा दुर्दैवी प्रकार घडला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून प्रशासनाने तातडीने चौकशी सुरू केली आहे.
शनिवारी दुपारी सुमारे १२.२० वाजण्याच्या सुमारास जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीजवळील मेट्रो पिलरवरील सिमेंटचा मोठा तुकडा तुटून खाली पडला. त्या वेळी रस्त्यावरून प्रवाशांनी भरलेली रिक्षा आणि एक कार जात होती. अचानक झालेल्या या दुर्घटनेत रिक्षातील प्रवासी गंभीर जखमी झाले. स्थानिकांनी आणि आपत्कालीन पथकांनी तातडीने जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केले.

या अपघातात रामधन यादव यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ते उत्तर प्रदेशातील जौनपूर जिल्ह्यातील एका गावचे विद्यमान सरपंच होते. मिळालेल्या माहितीनुसार, रामधन यादव हे माजी सरपंच महेंद्र प्रताप यादव यांच्यासह मुंबईत फिरण्यासाठी आले होते. मुलुंडमध्ये त्यांच्या मित्राचे दुकान असून तेथून ते कळवा येथे एका नातेवाईकाच्या लग्नासाठी जात असताना हा अपघात घडला. मुंबईतील भेट संपवून ते दोन दिवसांत गावी परतण्याच्या तयारीत होते; मात्र नियतीने घात केला.
उपासनी रुग्णालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, अपघातात एकूण चार जण जखमी झाले होते. त्यापैकी रामधन यादव यांना रुग्णालयात आणण्यापूर्वीच मृत घोषित करण्यात आले. राजकुमार इंद्रजीत यादव (वय ४५) यांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. महेंद्र प्रताप यादव (वय ५२) आणि दीपा रुहिया (वय ४०) यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. मृतदेह शवविच्छेदनासाठी पुढील प्रक्रियेसाठी पाठविण्यात आला आहे.
घटनेची माहिती मिळताच मुंबईच्या महापौर रितू तावडे आणि उपमहापौर संजय घाडी यांनी रुग्णालयात भेट देत जखमींची विचारपूस केली. उपमहापौरांनी सांगितले की, स्लॅब कोसळल्याने रिक्षा आणि कारचे मोठे नुकसान झाले असून या प्रकरणात जबाबदार आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. संपूर्ण घटनेचा अहवाल राज्य सरकारला सादर करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या दुर्घटनेबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी तातडीने उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले असून मृताच्या वारसांना पाच लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. तसेच जखमींच्या उपचाराचा संपूर्ण खर्च राज्य सरकार उचलणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही घटनेची माहिती देण्यात आली असून संबंधित यंत्रणांना जबाबदारी निश्चित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
दरम्यान, या घटनेनंतर यादव कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी नातेवाईकांनी प्रशासनाकडे केली आहे. मेट्रोसारख्या महत्त्वाच्या प्रकल्पांदरम्यान सुरक्षेच्या उपाययोजना कितपत पाळल्या जात आहेत, याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.



