मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटना जळगाव तर्फे अंगणवाडी कर्मचारी महिलांच्या मानधनात भरीव स्वरूपाची वाढ मिळावी, लाडकी बहीण योजनेत त्यांचा समावेश करावा यासह इतर प्रलंबित मागण्याबाबत आज ३१ जुलै रोजी जळगाव जिल्हा परिषदे वरती छत्री मोर्चा काढण्यात येऊन मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या छत्री मोर्चात सहभागी होऊन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे आंदोलनाला पाठींबा दर्शविला.
रोहिणी खडसे म्हणाल्या ‘अंगणवाडी कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या मानधनात भरीव वाढ करावी त्यांना पेंशन योजना व ग्रॅच्यएटी, महागाई भत्ता, विमा संरक्षण लागू करावे , लाडकी बहीण योजनेत अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा समावेश करावा त्यांना सेवा समाप्तीचा लाभ त्वरित मिळावा, मोबाईल रिचार्जे बिलात वाढ व्हावी, अंगणवाडी लाभार्थ्यांना देण्यात येणारा पोषण आहाराचा दर्जा सुधारून पोषण आहाराचे काम बचत गटांना देण्यात यावे, अंगणवाडी सेविकांना स्वेच्छा बदली मिळावी, भरपगारी आजारी रजा मिळावी व थकीत बिले लवकर अदा करणे, १० वी पास मदतनीसाना सेविका पदी बढती मिळावी व त्यांची मागील सेवा सलग धरण्यात यावी, रिक्त पदांची भरती करण्यात यावी अशा अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्या असुन त्या रास्त आहेत त्या सोडविण्या बाबत सत्ताधारी वेळोवेळी आश्वासन देऊनही त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत आहेत. त्यांच्या या मागण्यांसाठी असणाऱ्या या लढ्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष त्यांच्या सोबत असल्याचा रोहिणी खडसे यांनी अंगणवाडी कर्मचाऱ्यांना विश्वास दिला’.
पुढे बोलताना रोहिणी खडसे म्हणाल्या ‘कोणतीही शासकीय योजना असो ती राबविण्यासाठी अंगणवाडी सेविकांची मदत घेतली जाते सध्या सुरू असलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची सुद्धा अंगणवाडी सेविकांना जबाबदारी देण्यात आली आहे. अंगणवाडी सेविका यासुद्धा लाडक्या बहिणी असुन त्यांना देण्यात येणाऱ्या तुटपुंज्या मानधनात या काळातसंसार चालवणे कठिण असुन या लाडक्या बहिणीकडे सुद्धा सरकारने लक्ष द्यावे’.
राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे यापूर्वी सुद्धा राज्यभरात अंगणवाडी सेविकांच्या प्रश्नांबाबत जिल्हा परिषद वरती आंदोलन करण्यात आले आहे. आता सुद्धा आमचा पक्ष अंगणवाडी कर्मचाऱ्यांसोबत असुन येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर सहानुभूतीपुर्वक विचार करून ते सोडविण्यात येतील असे रोहिणी खडसे यांनी अंगणवाडी कर्मचाऱ्यांना आश्वासन दिले. यावेळी हजारोंच्या संख्येने अंगणवाडी कर्मचारी उपस्थित होत्या