पहूर, ता . जामनेर, प्रतिनिधी | अस्मानी संकटातून सावरत नाही तोच शेतकऱ्यांची व्यापाऱ्यांकडून लूट होताना दिसत आहे. अपार मेहनतीने पिकवलेल्या कापसाची अवघ्या दोन ते तीन हजार रुपये प्रतिक्विंटलने खासगी व्यापाऱ्यांकडून खरेदी केली जात आहे. पाच हजार पाचशे पन्नास रुपये शासनाचा हमीभाव असतांना मातीमोल किंमतीने पांढरे सोने अडलेल्या- नडलेल्या शेतकऱ्यांना विकावे लागत आहे. यामुळे शेतकरी पुरता हैराण झाला आहे.
यंदा दिर्घकाळ चाललेल्या पावसामुळे हंगाम लांबला. कुठेतरी दिवाळीत कापसाचा हंगाम सुरू होईल असे वाटत असतानाच ऐन दिवाळीत अतिवृष्टीसदृष्य पाऊस झाल्याने हाता-तोंडाशी आलेला घास हिरावला गेला. पहूर परिसरात हजारो हेक्टर क्षेत्रातील पिके उद्ध्वस्त झाली आहेत. कपाशी, ज्वारी, मका, सोयाबीन, केळी, मिरची यासह सारीच पिके जमीनदोस्त झाली आहेत. पहूरसह सांगवी, खर्चाणे, पिंपळगांव, हिवरी हिवरखेडा आदी भागात नदीकिनाऱ्यावरील शेतकऱ्यांच्या पिकांसह मातीही वाहून गेली आहे. या अस्मानी संकटामुळे शेतकरी धाय मोकलून रडत आहे. शासनाने पंचनामे करून तत्काळ मदत देणार असल्याचे जाहीर केल्याने काहीसा दिलासा शेतकऱ्यांना मिळाला आहे.तथापी आर्थिक कोंडीत सापडलेल्या शेतकऱ्यांच्या असहायतेचा गैरफायदा घेत खासगी व्यापाऱ्यांकडून मातीमोल भावाने कापसाची खरेदी होत असल्याने शेतकरी वर्गातून प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान, कापूस व्यापारी संजय पाटील यांनी सांगितले की,पावसामुळे ओला झालेल्या कापसाची गुणवत्ता ढासळली गेली असल्याने बाबीसशे ते तीन हजार पर्यंत भाव दिला जात आहे. दोन दिवसात ९० ते १०० क्विंटल कापूस आम्ही खरेदी केला आहे. तर पहूर कसबे येथील शेतकरी ज्ञानेश्वर लहासे यांनी यांनी आपली व्यथा मांडली की, अस्मानी संकटाने शेतकरी हैरान झालेला असतांना मातीमोल दराने पांढरे सोने विकावे लागत आहे. मी आज तीन क्विंटल एकवीस किलो कापूस २,८०० रूपये प्रति क्विंटल भावाने दिला. यामुळे आमचा झालेला खर्चही हाती आला नाही.