Home क्राईम केंद्रीय मंत्री रक्षाताई खडसे यांच्या पेट्रोल पंपावर दरोडा : बंदुकीच्या धाकाने रोकड...

केंद्रीय मंत्री रक्षाताई खडसे यांच्या पेट्रोल पंपावर दरोडा : बंदुकीच्या धाकाने रोकड लांबविली !


मुक्ताईनगर-पंकज कपले | केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांच्या पेट्रोल पंपावर रात्री उशीराच्या सुमारास बंदुकीच्या धाकावर दरोडा टाकण्यात आल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

याबाबतची माहिती अशी की, रक्षाताई खडसे यांच्या मालकीचा मुक्ताईनगर शहरात मध्यवर्ती ठिकाणी रक्षा ऑटो फ्युअल या नावाने पेट्रोल पंप आहे. काल रात्री पावणे अकरा वाजेच्या सुमारास दोन दुचाकींवरून पाच जण पेट्रोल पंपावर आले. त्यांनी तेथील दोन कर्मचाऱ्यांना मारहाण केली. याप्रसंगी त्यांनी कर्मचाऱ्यांच्या डोक्याला बंदूक लाऊन पेट्रोल पंपावरील सुमारे एक लाख रूपयांची रोकड लांबविली. तसेच त्यांनी पेट्रोल पंपाच्या परिसरात तोडफोड केली. त्यांनी सीसीटिव्ही, प्रिंटर व संगणकासह अन्य सामग्रीचे नुकसान केले. अवघ्या काही मिनिटांमध्ये धुडगुस घालून हे पाचही जण तेथून पळून गेले.

या घटनेची माहिती मिळताच मुक्ताईनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, हे दरोडेखोर बोहर्डा-बोहर्डी गावाच्या दिशेने पळून गेल्याची माहिती मिळताच पोलिसांनी त्या दिशेने तपास केला. रात्री बारा वाजेच्या सुमारास फॉरेन्सीक पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी या प्रकरणाची संपूर्ण माहिती जाणून घेतली. पोलीसांनी रात्रीच चौकशीची सूत्रे हलविली असून दरोडेखोरांचा शोध सुरू आहे.

ना. रक्षाताई खडसे यांचा पेट्रोल पंप हा शहराच्या मध्यातून जाणाऱ्या महामार्गाला लागून असल्याने दरोडेखोरांनी थेट बंदुकीचा धाक दाखवून येथे लूट केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. यामुळे मुक्ताईनक्षरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आल्याचे दिसून येत आहे.

या संदर्भात शेवटची माहिती मिळाली तेव्हा मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.


Protected Content

Play sound