यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गावर भर दुपारी घडलेल्या एका धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. चोपडा-यावल रोडवरील चुंचाळे फाट्याजवळ अज्ञात चोरट्यांनी दुचाकी अडवून चाकूचा धाक दाखवत साडे चोवीस लाख रुपयांची रोकड लुटल्याची घटना समोर आली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
भुसावळ येथील खाजगी कंपनीत कार्यरत असलेले किरण प्रभाकर पाटील (वय ५०, रा. राम मंदिर वार्ड, भुसावळ) हे चोपडा येथून दुचाकीने साडे चोवीस लाख रुपये एका बॅगेत घेऊन भुसावळकडे जात होते. दुपारच्या सुमारास ते चोपडा-यावल मार्गावरील चुंचाळे फाट्याजवळ पोहोचताच दुसऱ्या दुचाकीवर आलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी त्यांची वाट अडवली. क्षणात चाकूचा धाक दाखवत रोकड असलेली बॅग हिसकावून आरोपी घटनास्थळावरून पसार झाले.

या घटनेनंतर किरण पाटील यांनी तातडीने रात्रीच्या सुमारास यावल पोलीस ठाणे गाठून घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे हे पथकासह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून आरोपी ज्या दिशेने पळाले त्या दिशेने शोध मोहीम सुरू केली आहे.
दरम्यान, घटनेची गंभीरता लक्षात घेता फैजपूर विभागाचे विभागीय पोलीस अधिकारी अनिल बडगुजर यांनीही घटनास्थळी भेट देऊन तपासाची पाहणी केली. राष्ट्रीय महामार्गावर भर दिवसा झालेल्या या दरोड्यामुळे सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून परिसरातील व्यापारी व वाहनधारकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. पोलीस आरोपींचा शोध घेण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक माहिती व स्थानिक माहितीदारांच्या आधारे तपास करत आहेत.
भर दुपारी महामार्गावर घडलेल्या या दरोड्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून लवकरात लवकर आरोपी जेरबंद व्हावेत, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.



