भुसावळ लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ तालुक्यातील निंभोरा येथील बोगद्याजवळून पायी जात असलेल्या एका प्रौढाला अनोळखी तीन व्यक्तींनी चाकूचा धाक दाखवत पॅन्टच्या खिशातून २० हजार रूपये जबरी चोरून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
अधिक माहिती अशी की, दिनेश रामदास विखरे वय ४६ रा. दिपनगर, भुसावळ हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. सोमवारी ९ डिसेंबर रोजी रात्री ९ वाजता दिनेश विखरे हे निंभोरा गावाजवळील रेल्वे बोगद्याजवळून पायी जात असतांना तीन अनोळखी व्यक्तींनी थांबवून चाकूचा धाक दाखवत त्यांच्या खिश्यात असलेल्या २० हजारांची रोकड जबरी हिसकावून चोरून नेली. दरम्यान दिनेश विखरे यांनी भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून रविवारी १५ डिसेंबर रोजी दुपारी १ वाजता भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मंगेश दराडे हे करीत आहे.