जळगाव प्रतिनिधी | शहरातील आकाशवाणीपासून डीएसपी चौक ते रामानंद नगर पर्यंतच्या रस्त्याची डागडुजी करण्याच्या कामाला आज (दि.३०) सकाळी सुरुवात झाली आहे. हे काम गेल्या सुमारे दीड महिन्यापूर्वीच मंजूर करण्यात आलेले असून त्यात आचारसंहितेचा प्रश्नच नसल्याचे संबंधितांनी ‘लाईव्ह ट्रेंड्स न्यूज’शी बोलताना सांगितले.
हे काम मधल्या काळात सतत पडणाऱ्या पावसामुळे लांबले होते, ते आता पूर्ण केले जात आहे. शहरात ४२ कोटींच्या कामांना मंजुरी मिळाली असून ज्या भागात पाईपलाईनचे काम पूर्ण झाले आहे, त्याभागात या अंतर्गत रस्त्यांची व गटारींची डागडुजी केली जाणार आहे. ही कामे निवडणुकांनंतर लगेचच सुरु होणार आहेत. शहरात रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिकांची गैरसोय होत असली तरी लवकरच होणाऱ्या विकास कामांचा लाभ नागरिकांना मिळणार आहे. त्यामुळे हे खड्डे नाकर्तेपणाचे नसून विकासाचे आहेत, असा दावाही संबंधितांनी केला आहे.