
पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पारोळा तालुक्यातून जाणाऱ्या मुकटी-एरंडोल महामार्गाची दयनीय अवस्था झाली असून, जागोजागी पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. या मार्गावर दररोज लहान-मोठे अपघात घडत आहेत. सुमारे २५० हून अधिक आलिशान गाड्या रात्रीच्या वेळी या मार्गाचा वापर करतात, त्यामुळे कोणत्याही क्षणी मोठा अपघात होण्याची शक्यता वाढली आहे.

टोल कर्मचाऱ्यांची मुजोरी; आमदार-खासदारांकडे लक्ष वेधले
या रस्त्यावरील सबगव्हाण टोल नाक्यावर टोल कर्मचाऱ्यांकडून वाहनधारकांची दादागिरी आणि मुजोरी सुरू असल्याचा आरोप होत आहे. टोलवसुलीच्या नावाखाली लाखो रुपये कमावले जात असतानाही, रस्त्याची दुरुस्ती केली जात नाही. नुकतेच एका मेडिकल ऑफिसरसोबत घडलेला प्रकार या दादागिरीचे ज्वलंत उदाहरण आहे. आमदार अमोल पाटील यांनी केलेल्या मध्यस्थीनंतर, स्थानिक वाहनधारकांना प्रतिफेरी २० रुपये टोल ठरविण्यात आला होता, मात्र टोल कर्मचाऱ्यांनी ही रक्कम स्वीकारण्यास नकार देत, थेट ३००० रुपयांची पावती फाडण्याची धमकी दिली. टोल कर्मचारी थेट ‘आम्ही कोणालाही भीत नाही’ अशी भाषा वापरत असल्याची तक्रारही वाहनधारकांनी केली आहे.
प्रवाशांची मोठी गैरसोय; आरोग्य सुविधाही दुर्लक्षित
टोल नाक्यावर केवळ दादागिरीच नाही, तर मूलभूत सुविधांचाही अभाव आहे. वाहनधारकांसाठी असलेल्या स्वच्छतागृहांची अवस्था अतिशय खराब आहे, त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. कोट्यवधी रुपयांची टोलवसुली होत असतानाही, वाहनधारकांना सोयी-सुविधा पुरवण्यात टोल प्रशासन अपयशी ठरले आहे. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे होणारे अपघात आणि टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांची अरेरावी यामुळे वाहनधारकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.
आंदोलनाचा इशारा; लोकप्रतिनिधींनी लक्ष घालण्याची मागणी
या गंभीर प्रश्नावर स्थानिक लोकप्रतिनिधींनी लक्ष घालून तोडगा काढण्याची मागणी वाहनधारकांकडून होत आहे. पारोळा तालुक्याचे आमदार अमोल पाटील, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आणि जळगाव जिल्ह्याच्या खासदार स्मिता पाटील यांनी या प्रश्नात त्वरित लक्ष घालावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. जर रस्त्याचे काम त्वरित सुरू झाले नाही आणि दादागिरी करणाऱ्या टोल कर्मचाऱ्यांवर कारवाई झाली नाही, तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा वाहनधारक संघटनांनी दिला आहे.



