जळगाव-लाईव्ह ट्रेडस न्यूज प्रतिनिधी । छत्रपती शिवाजीनगर उड्डाणपुलावर शनिवारी २२ मार्च रोजी दुपारी २.३० वाजता मोठा अपघात झाला. उड्डाणपुलावरून जात असलेल्या ट्रकचे अचानक ब्रेक फेल झाल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि हा ट्रक उतारावरून मागे आला. त्यामुळे पुलाजवळ उभ्या असलेल्या तीन रिक्षांसह चार ते पाच दुचाकींना धडक दिली. या अपघातात चार जण गंभीर जखमी झाले असून, रिक्षाचालक सुरेश रूपचंद जैस्वाल (वय ५५) यांचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, सुरत रेल्वेगेटजवळ असलेल्या मालधक्क्यावरून सिमेंट भरून (एमएच १९, सीवाय ७७४५) क्रमांकाचा ट्रक शिवाजीनगर उड्डाणपुलावरून जात होता. पुलावर काही अंतर कापल्यानंतर अचानक ट्रकचे ब्रेक फेल झाले आणि ट्रक उतारावरून मागच्या बाजूने रिव्हर्स येऊ लागला. पूर्णपणे भरलेला ट्रक भरधाव वेगाने रिव्हर्स येत असल्याने त्याने तीन रिक्षा आणि चार ते पाच दुचाकींना चिरडले. यात राधाकृष्ण नगरातील रहिवासी आणि रिक्षाचालक सुरेश रूपचंद जैस्वाल हे गंभीर जखमी झाले होते. रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला.
राधाकृष्ण नगरातील रहिवासी सुरेश रूपचंद जैस्वाल हे रिक्षा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले आणि एक मुलगी असा परिवार आहे. त्यांची अंत्ययात्रा २३ मार्च रोजी दुपारी चार वाजता त्यांच्या राहत्या घरातून निघणार आहे.