जळगाव- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील मेहरुण तलाव परिसरातील नेहरूनगर जवळ सोमवारी २ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास पोलीस एस्कॉर्ट वाहन आणि रिक्षाचा भीषण अपघात झाला. या अपघातात रिक्षेतील एकाच कुटुंबातील सदस्यांसह एकूण ८ जण गंभीर जखमी झाले आहेत. रस्त्यावरील खड्डा चुकवण्याच्या प्रयत्नात हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भाजपचे प्रसिद्ध खासदार मनोज तिवारी हे पारोळा येथे एका धार्मिक कार्यक्रमासाठी आले होते. त्यांना ‘वाय प्लस’ (Y+) दर्जाची सुरक्षा असल्यामुळे जळगाव जिल्हा पोलीस दलातर्फे त्यांना एस्कॉर्ट वाहन पुरवण्यात आले होते. खासदार तिवारी यांना संभाजीनगरच्या हद्दीत सोडून हे एस्कॉर्ट वाहन जळगावकडे परत येत असताना मेहरुण तलावाजवळ हा अपघात घडला. रस्त्यावरील एक मोठा खड्डा वाचवण्याच्या प्रयत्नात असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि रिक्षा मातीच्या ढिगाऱ्यावरून थेट पोलीस वाहनावर जाऊन आदळली.

या धडकेत रिक्षेचा अक्षरशः चक्काचूर झाला असून पोलीस वाहनाचेही मोठे नुकसान झाले आहे. अपघातातील सर्व जखमींना तातडीने जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (सिव्हिल हॉस्पिटल) दाखल करण्यात आले आहे. जखमींमध्ये ज्योती एकनाथ बारी (वय ४५), एकनाथ रामदास बारी (वय ५०), अश्विनी शुभम कुमावत (वय २५), रत्ना शंकर मिस्तरी (वय ४८), सुशीला दिलीप बारी (वय ५५), कीर्ती शिवाजी बारी (वय ४०), कुणाल शिवाजी बारी (वय १३) आणि ४ वर्षांची चिमुकली प्रियांशी शुभम कुमावत यांचा समावेश आहे. हे सर्वजण जळगावमधील हरी विठ्ठल नगरचे रहिवासी आहेत.जखमींना तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी घटनेची पुष्टी केली असून, खासदारांच्या ताफ्यातील परतीच्या प्रवासातील वाहनाचा हा अपघात असल्याचे सांगितले. जखमींनी दिलेल्या माहितीनुसार, खराब रस्ते आणि जीवघेण्या खड्ड्यांमुळेच हा अपघात घडला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून रस्त्यांच्या दुरावस्थेबाबत संताप व्यक्त केला जात आहे. एमआयडीसी पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.



