जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यातील शेतीसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या शेळगाव बॅरेज मध्यम प्रकल्पाला तब्बल १४०७.२० कोटी रुपयांची तृतीय सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाल्याने जिल्ह्यातील सिंचन व्यवस्थेला मोठी चालना मिळणार आहे. राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हा निर्णय शक्य झाला असून प्रकल्प पूर्णत्वास जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
तापी नदीवरील हा प्रकल्प विशेषतः यावल तालुक्यासाठी जीवनदायी मानला जात असून यामुळे सुमारे ९१२८ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. त्यापैकी ११ गावांतील १२२८ हेक्टर क्षेत्राला थेट लाभ मिळणार आहे. वर्षभर पाणी उपलब्ध झाल्यामुळे शेती उत्पादनात वाढ होण्यास मदत होईल आणि शेतकऱ्यांचे उत्पन्नही वाढण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

या प्रकल्पाच्या खर्चात कालानुरूप वाढ होत गेली आहे. सुरुवातीला १९९७-९८ मध्ये १९८ कोटी रुपयांची मूळ प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. त्यानंतर २०११-१२ मध्ये ६९९.४८ कोटी रुपयांची पहिली सुधारणा, २०१७-१८ मध्ये ९६८.९७ कोटी रुपयांची दुसरी सुधारणा करण्यात आली. आता २०२३-२४ मध्ये तिसरी सुधारणा करत प्रकल्पाचा खर्च १४०७.२० कोटी रुपयांपर्यंत वाढवण्यात आला आहे.
आर्थिकदृष्ट्या हा प्रकल्प सक्षम मानला जात असून याचा लाभ-खर्च गुणोत्तर (B/C Ratio) १.९१ आहे, तर अंतर्गत परतावा दर (IRR) १०.७२ टक्के आहे. बॅरेजची एकूण साठवण क्षमता ४.११ टीएमसी इतकी असून त्यामध्ये १८ दरवाजे बसविण्यात येणार आहेत. प्रकल्पासाठी आवश्यक असलेली १९६१.४७ हेक्टर जमीन पूर्णपणे संपादित करण्यात आली आहे.
बॅरेजचे मुख्य बांधकाम पूर्ण झाले असून बुडीत क्षेत्रातील चार पुलांपैकी दोन पुलांचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित दोन पुलांचे कामही लवकरच पूर्ण करण्यात येणार आहे. सध्या बॅरेजमध्ये २.८९ टीएमसी म्हणजेच सुमारे ७० टक्के पाणीसाठा करण्यात आलेला आहे, ज्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
या प्रकल्पामुळे दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यास मोठी मदत होणार असून जलसंपदा व्यवस्थापन अधिक सक्षम होणार आहे. मंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली जलसंपदा विभागाने घेतलेल्या या निर्णयामुळे जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांना गती मिळाली आहे. या निर्णयाबद्दल यावल तालुक्यातील शेतकरी बांधवांनी समाधान व्यक्त करत शासनाचे आभार मानले आहेत.



