यावल ( प्रतिनिधी) तालुक्यातील जाणवत असलेल्या काही भागातील भीषण पाणी टंचाईच्या पार्श्वभुमीवर काल उपजिल्हाधिकारी यांनी तत्काळ अधिकाऱ्यांची बैठक घेवुन, महत्वाच्या सुचना दिल्या आहेत. तसेच त्यावर तात्काळ अंमलबजावणीचे आदेशही दिले आहेत.
या संदर्भात काल (दि ३) सकाळी ११.०० वाजता येथील तहसील कार्यालयातील दालनात रोजगार हमी योजनेचे उपजिल्हाधिकारी प्रसाद मते यांनी तालुक्यातील सर्व मंडळ अधिकारी व तलाठी यांच्याकडून पाणीटंचाई, गौण खनिज, रोजगार हमीची कामे या विषयांवर सविस्तर आढावा घेतला. प्रत्येक गावातील तलाठी व मंडळ अधिकारी यांनी पाणीटंचाई व त्यामुळे ओढवणाऱ्या संकटावर मात करण्यासाठी आपल्या गाव परिसरातील पाण्याचा पर्यायी मार्ग शोधुन तसा माहिती अहवाल आपल्या तहसील कार्यालयास तात्काळ सादर करावा असे आदेश दिले आहेत. त्याच बरोबर गेल्या काही दिवसांपासुन तालुक्यात गौण खनिजाची वाढत्या तस्करीला प्रतिबंध घालण्यासाठी महसुल विभागाच्या माध्यमातुन रात्रीची गस्त वाढवण्यात यावी, अशी सुचनाही त्यांनी दिली आहे.
तहसीलच्या दालनात झालेल्या या पाणीटंचाई आढावा बैठकीत प्रांताधिकारी डॉ. अजीत थोरबोले, तहसीलदार जितेंद्र कुंवर, निवासी नायब तहसीलदार आर.के. पवार, पंजे यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते. रोजगार हमीचे उपजिल्हाधिकारी प्रसाद मते यांनी येथील सामाजीक वनीकरणाच्या रोपवाटीका विभागाचीही यावेळी पाहणी करून संबंधित अधिकारी प्रज्ञा वडमारे यांना सुचना दिल्या. त्याच बरोबर त्यांनी दुष्काळामुळे ओढवणाऱ्या पाणीटंचाईच्या पार्श्वभुमीवर तालुक्यातील नायगाव व बोरखेडा खुर्द या गावांचीही पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतला.