Home प्रशासन तहसील यावल येथे पेसा क्षेत्रातील विकासकामांबाबत आढावा बैठक

यावल येथे पेसा क्षेत्रातील विकासकामांबाबत आढावा बैठक


यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प विभागांतर्गत येणाऱ्या आदिवासी बहुल ‘पेसा’ क्षेत्रातील गावांच्या विकासकामांना गती देण्यासाठी आणि आदिवासी समाजाच्या हक्कांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी यावल पंचायत समितीच्या सभागृहात एक महत्त्वाची आढावा बैठक पार पडली. जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक घेण्यात आली.

या बैठकीस आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी अरूण पवार, पंचायत समिती व जिल्हा परिषद स्तरावरील विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. प्रामुख्याने यावल, रावेर आणि चोपडा या तीन तालुक्यातील पेसा क्षेत्रांतर्गत येणाऱ्या गावांच्या प्रलंबित प्रश्नांवर आणि शासकीय योजनांच्या अंमलबजावणीवर यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली.

आदिवासी हक्कांना मिळणार गती बैठकीमध्ये आदिवासी बांधवांचे हक्क, अधिकार आणि गावांमध्ये होणाऱ्या विविध शासकीय विकासकामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. शासकीय पातळीवर या कामांना येणारे अडथळे दूर करून, योजनांचा लाभ थेट शेवटच्या घटकापर्यंत कसा पोहोचवता येईल, यावर अधिकाऱ्यांनी भर दिला. पेसा कायद्यांतर्गत मिळणाऱ्या निधीचा विनियोग आणि त्यातून होणारी गावांमधील पायाभूत कामे वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.


Protected Content

Play sound