Home Cities जळगाव “माझे शहर माझी जबाबदारी” उपक्रमा अंतर्गत जळगाव मनपात आढावा बैठक

“माझे शहर माझी जबाबदारी” उपक्रमा अंतर्गत जळगाव मनपात आढावा बैठक

0
117

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । शहर स्वच्छता आणि नागरिकांच्या सहभागातून शाश्वत स्वच्छतेचा संकल्प अधिक प्रभावी करण्याच्या उद्देशाने जळगाव महानगरपालिकेत आज एक महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. “माझे शहर माझी जबाबदारी” या उपक्रमाच्या वतीने देण्यात आलेल्या स्मरणपत्राच्या अनुषंगाने ही बैठक आयोजित करण्यात आली असून शहरातील स्वच्छता व्यवस्थेतील प्रगती, अडचणी आणि पुढील उपाययोजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

महानगरपालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस उपायुक्त निर्मला गायकवाड, सहायक उपायुक्त (आरोग्य विभाग) श्री. उदय पाटील, शहर अभियंता श्री. योगेश बोरोले, BVG कंपनीचे वरिष्ठ अधिकारी, सर्व स्वच्छता निरीक्षक, इतर मनपा अधिकारी तसेच “माझे शहर माझी जबाबदारी” उपक्रमाची टीम उपस्थित होती. शहरातील स्वच्छतेच्या प्रत्येक घटकावर समन्वयाने काम करण्याचा निर्धार यावेळी स्पष्टपणे व्यक्त झाला.

बैठकीदरम्यान नागरिकांनी यापूर्वी मांडलेल्या दहा मुद्द्यांवर महानगरपालिकेने केलेल्या कारवाईचा सविस्तर आढावा सादर करण्यात आला. वाढत चाललेले Garbage Vulnerable Points (GVPs), कचरा संकलनाच्या वेळेतील अनियमितता, ओला व सुका कचरा वेगळा करण्याची सक्ती, बाजारपेठांची रात्रीची स्वच्छता, ठेलेवाले व हॉकर्ससाठी स्वतंत्र कचरा व्यवस्थापन तसेच सिंगल यूज प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी या सर्व बाबींवर प्रशासनाने उचललेल्या पावलांची माहिती देण्यात आली. या समस्यांची मुळ कारणे, प्रत्यक्षातील अडचणी आणि त्या सोडवण्यासाठी राबवता येणाऱ्या प्रभावी उपाययोजनांवर सखोल चर्चा झाली.

आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांनी स्वच्छतेच्या कामात सातत्य राखण्याचे आणि सर्व विभागांनी एकत्रितपणे समन्वयाने काम करण्याचे स्पष्ट निर्देश दिले. नागरिकांच्या सूचना व तक्रारींवर त्वरित प्रतिसाद देणे, प्रभागनिहाय देखरेख अधिक सक्षम करणे आणि स्वच्छता दूतांच्या माध्यमातून जनजागृती वाढवण्यावर विशेष भर देण्यात आला. प्रशासन व नागरिक यांचे सहकार्य वाढल्यास शहरातील स्वच्छता व्यवस्थेत लवकर आणि ठोस सुधारणा घडवून आणता येतील, असे मत त्यांनी व्यक्त केले.

“माझे शहर माझी जबाबदारी” उपक्रमाच्या टीमने मनपाने केलेल्या प्राथमिक तसेच प्रगत कारवाईचे स्वागत करत ही प्रक्रिया सातत्याने आणि काटेकोरपणे सुरू ठेवण्याची अपेक्षा व्यक्त केली. बैठकीत झालेली चर्चा आणि प्रशासनाची तयारी पाहता, येत्या काळात जळगाव शहरातील स्वच्छता व्यवस्थेत सकारात्मक आणि दृश्यमान बदल अनुभवायला मिळतील, अशी आशा व्यक्त करण्यात आली.

एकूणच प्रशासन, नागरिक आणि सामाजिक उपक्रम यांच्या संयुक्त प्रयत्नातून जळगाव शहर स्वच्छतेच्या दिशेने अधिक वेगाने पुढे जात असल्याचे या आढावा बैठकीतून स्पष्ट झाले.


Protected Content

Play sound