एरंडोल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । एरंडोल तालुक्यातील कासोदा गाव परिसरात गेल्या काही दिवसांपासून अवैध वाळू उपसा आणि वाहतूक जोरात सुरू असल्याची तक्रार प्राप्त होत होती. याच पार्श्वभूमीवर महसूल पथकाने बुधवारी, ११ फेब्रुवारी रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास मोठी कारवाई केली. या कारवाईत अवैधपणे वाळूची वाहतूक करणारे दोन डंपर जप्त करण्यात आले असून, सुमारे १० लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कासोदा रोड परिसरातून डंपरच्या साह्याने विनापरवाना वाळूची चोरटी वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती महसूल विभागाच्या पथकाला मिळाली होती. या माहितीची शहानिशा करण्यासाठी पथकाने परिसरात सापळा रचला. यावेळी दोन संशयित डंपर येताना दिसले, ज्यांना पथकाने थांबवून तपासणी केली.

तपासणी दरम्यान डंपर क्रमांक (MH 19 CY 8383) आणि डंपर क्रमांक (MH 19 CW 8383) या दोन्ही वाहनांमध्ये मोठ्या प्रमाणावर विनापरवाना वाळू भरलेली असल्याचे आढळून आले. डंपर चालकांकडे वाळू वाहतुकीचे कोणतेही अधिकृत परवाने नसल्याचे स्पष्ट झाल्याने महसूल पथकाने दोन्ही वाहने जप्त केली. या प्रकरणी डंपर चालक दिलीप काशीनाथ पाटील (रा. उत्राण) आणि अक्षय विश्वास पाटील (रा. ताडे, ता. एरंडोल) या दोघांविरोधात एरंडोल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जप्त करण्यात आलेल्या १० लाख ५० हजार रुपयांच्या ऐवजामध्ये दोन्ही डंपर आणि त्यातील वाळूच्या साठ्याचा समावेश आहे. महसूल विभागाच्या या धडक कारवाईमुळे वाळू माफियांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक फौजदार विजय पाटील हे करत असून, यामध्ये आणखी कोणाचे धागेदोरे आहेत का, याचा शोध घेतला जात आहे.



