जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । राज्य सरकारकडून मानधनावर कार्यरत असलेल्या महसूल सेवक (पूर्वाश्रमीचे कोतवाल) यांना अद्यापही शासकीय चतुर्थ श्रेणीचा दर्जा न मिळाल्याने संतप्त महसूल सेवक संघटनांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. यावल तालुक्यातील महसूल सेवकांनी आपल्या मागण्यांसाठी तहसीलदार कार्यालयात निवेदन देत सरकारला ११ सप्टेंबरपर्यंतचा अल्टीमेटम दिला आहे.
सदर निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे की, महसूल विभागाच्या कामकाजाचा पाया असलेले महसूल सेवक ग्रामस्तरावर शासनाच्या विविध योजना राबवण्यात महत्वाची भूमिका बजावत आहेत. पिक पाहणी, निवडणूक प्रक्रिया, मतदान यादी अद्ययावत करणे, रात्र गस्त, टपाल वितरण, कार्यालयीन कामकाज, वाहन चालविणे अशा अनेक जबाबदाऱ्या ते नियमित कर्मचाऱ्यांप्रमाणे पार पाडत असतानाही त्यांना शासनाने अजूनही चतुर्थ श्रेणीचा दर्जा दिलेला नाही.

वास्तविक, गेल्या अनेक वर्षांपासून शासनाकडे वारंवार मागणी करूनही महसूल सेवकांच्या पदाची प्रशासकीय मान्यता मिळालेली नाही. शासन निर्णयांचा लाभ त्यांना दिला जात नाही. त्यामुळे त्यांच्यात तीव्र नाराजी आहे. यामुळेच विदर्भ महसूल सेवक संघटनेच्या नेतृत्वाखाली राज्यभर बेमुदत कामबंद, साखळी उपोषण आणि धरणे आंदोलन सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
यावल तालुक्याच्या आस्थापनेवरील सर्व महसूल सेवकांनी या आंदोलनाला एकमुखी पाठिंबा दर्शविला असून, आपल्या भावना शासनापर्यंत पोहोचवाव्यात, अशी मागणी त्यांनी तहसीलदारांकडे केली आहे. आंदोलनात सहभागी होण्यासाठी महसूल सेवकांनी १२ सप्टेंबरपासून मुख्यालय सोडून नागपूर येथे जाण्याची परवानगी मागितली आहे.
या निवेदनावर अध्यक्ष विशाल उज्जैनसिंग राजपूत, उपाध्यक्ष जयश्री रुपेश कोळी आणि सचिव ओंकार लिलाधर सपकाळे यांची स्वाक्षरी आहे. शासनाने लवकरात लवकर चतुर्थ श्रेणीचा दर्जा जाहीर करून न्याय द्यावा, अन्यथा लढा तीव्र करण्यात येईल, असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.



