

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । वाळू माफियांकडून महसूल पथकावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ अमळनेर तालुका ग्राम महसूल अधिकारी संघाने आपले आंदोलन अधिक तीव्र केले आहे. शुक्रवारी, १९ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास तालुक्यातील सर्व महसूल अधिकाऱ्यांनी काही तातडीची कामे वगळता आपल्या मागण्यांसाठी अमळनेर तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन कायम ठेवल्याचे दिसून आले.
गेल्या आठवड्यात अवैध गौण खनिजावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या महसूल पथकाला वाळू माफियांनी थेट गावठी पिस्तूल लावून धमकावले होते. या घटनेमुळे तालुक्यातील महसूल कर्मचाऱ्यांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण आहे. आपल्या जीविताला धोका असताना काम कसे करायचे, असा सवाल उपस्थित करत या संघाने लाक्षणिक आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. आज तहसील कार्यालयाच्या परिसरात जमलेल्या महसूल अधिकाऱ्यांनी प्रशासनाच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी केली.
आंदोलक अधिकाऱ्यांच्या मते, “जोपर्यंत वाळू माफियांवर कठोर कायदेशीर कारवाई होत नाही आणि कर्मचाऱ्यांना कामाच्या ठिकाणी पुरेसे संरक्षण मिळत नाही, तोपर्यंत आमचा हा पवित्रा कायम राहील.” या आंदोलनामुळे महसूल विभागाच्या दैनंदिन कामकाजावर परिणाम झाला असून, केवळ अतिमहत्त्वाची शासकीय कामेच सध्या केली जात आहेत. या घटनेने वाळू माफियांनी प्रशासनावर बसवलेल्या दहशतीचा प्रश्न पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.



