जळगाव, प्रतिनिधी | नवनिर्वाचित मनपा स्थायी सभापती अॅड. शुचिता हाडा यांनी आज सकाळी स्थायी सभेत समितीच्या बैठकीनंतर ठराव सहीनिशी २४ तासात नगरसचिव यांना देण्याचा मानस व्यक्त केला होता. त्यांनी स्वच्छ व पारदर्शी कारभारासाठी हा निर्णय जाहीर केला होता. याची प्रचीती आली असून त्यांनी आजच दोन तासाच्या आत नगरसचिवांकडे ठराव सुपूर्द केले आहेत.
स्थायी सभेनंतर २४ तासात ठराव नगरसचिवाकडे सादर करण्याचा सभापतीं अॅड. शुचिता हाडा घेतल्याने असा निर्णय घेणारी महापालिका एकमेव महापालिका ठरली आहे. सभापती अॅड. शुचिता हाडा यांनी सभागृहात आपला मनोदय व्यक्त केल्यानंतर स्थायीच्या बैठकीनंतर अवघ्या दोन तासाच्या आत त्यांनी नगरसचिव सुनील गोराणे यांच्याकडे ठराव सहीनिशी सुपूर्द केलेत. त्यांच्या या गतीमान कारभाराने ठराव सहीनिशी देणे शक्य झाले आहे. त्यांच्या कार्यतत्परतेने वेगळाच अनुभव महापालिकेला घेता आला. यासोबतच त्यांनी महिन्याच्या प्रत्येक शुक्रवारी स्थायी सभा आयोजित केली जाईल असेही सांगितले आहे. यामुळे आता स्थायी सदस्यांना सभेचे आयोजन केव्हा करण्यात येणार आहे याची कल्पना पूर्वीपासून राहिल्याने त्यांना त्याच्या विषयाची अधिक माहिती घेण्यास वेळ मिळणार आहे. सभापती अॅड. शुचिता हाडा यांच्या या दोन्ही संकल्पांचे स्वागत होत आहे.