कासोदा, ता. एरंडोल प्रतिनिधी । पाणी पुरवठा करण्यात ग्रामपंचायत प्रशासनातर्फे दुजाभाव करण्यात येत असल्याच्या आरोपातून येथे प्रचंड वाद झाले असून ग्रामपंचायतीवर दगडफेक करण्यात आली आहे.
याबाबत वृत्त असे की, सध्या आवर्तनामुळे गिरणा पात्रात पाणी आलेले आहे. यामुळे कासोदा येथे पाणी पुरवठा करण्यात येत आहे. यात एका ठिकाणी जास्त वेळ पाणी पुरवठा करण्यात आला तर दुसर्या भागात कमी वेळ पाणी येत असल्याचा आरोप करून एक जमाव ग्रामपंचायत कर्मचार्यांना जाब विचारण्यासाठी आला. येथे ग्रामपंचायत कर्मचार्यांशी वाद झाल्यामुळे जमावातील काही तरूणांनी ग्रामपंचायत कार्यालयावर तुफान दगडफेक केली. यात कार्यालयातील खिडक्यांचे काच फुटले. अचानक झालेल्या या प्रकारामुळे पळापळ सुरू झाली. दरम्यान, पाणी पुरवठ्यात दुजाभाव कशासाठी ? अशी जमावातील स्त्री-पुरूष सातत्याने विचारणा करत होते. यामुळे येथे बराच काळ वाद झाला. अखेर ग्रामपंचायत कर्मचार्यांनी सरपंच आणि अन्य पदाधिकार्यांना पाचारण केले. ही घटना शनिवारी संध्याकाळी घडली असून यावर सामोपचाराचे उपाय खुंटल्यामुळे अखेर पोलीसात तक्रार दाखल करण्याच्या हालचाली सुरू असल्याचे वृत्त आहे.
पहा : कासोदा येथील ग्रामस्थांच्या उद्रेकाचा हा व्हिडीओ.