भुसावळ प्रतिनिधी । तालुक्यातील गोरगरीब नागरिकांना स्वस्त भाव दुकानांचे धान्य मिळावे, यासाठी जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याकडून शंभर टक्के नियतन मिळाले आहे. मात्र तरीही येथील तहसील कार्यालयाकडून ई-प्रणालीच्या नावाखाली हजारो लाभार्थ्यांना वंचित ठेवण्यात येत असल्यामुळे जि. प. सदस्य पल्लवी सावकारे यांनी शेकडो वंचित लाभार्थ्यांचे नेतृत्व करत तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला.
यासंदर्भात माहिती अशी की, जि.प. सदस्या सावकारे हे कार्यलयात येत असल्याचे पाहून तहसीलदार महेंद्र पवार हे त्या येण्यापूर्वीच कार्यालयातून कामानिमित्त बाहेर जात असल्याचे सांगून निघून गेले. तर प्रांताधिकारी यांनीही सावकारे यांना नमस्कार करून काढता पाय घेतला. दरम्यान, तालुक्यातील वंचित लाभार्थ्यांना दोन-तीन दिवसात धान्य न मिळाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. तर सावकारे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरल्यामुळे तहसील कार्यालयात चांगलीच खळबळ उडाली आहे. तालुक्यात अद्यापही ई-प्रणालीची काम अपूर्ण आहे. तालुक्यातील लाभार्थ्यांनी तहसील कार्यालयामध्ये चार-चार वेळेस आधार कार्ड, रेशनिंग कार्ड आदी कागदपत्रे देऊनही लाभार्थ्यांची नावे या ई-प्रणाली मध्ये समाविष्ट होत नाही. तहसील कार्यालयाचा हलगर्जीपणा व कमी मनुष्यबळामुळे हा प्रकार घडत आहे. त्यात जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडून मे महिन्यातही शंभर टक्के नियतन देण्यात आले असून, मात्र तरीही दुकानदारांना ई-प्रणालीच्या नावाखाली तहसील कार्यालयातून पुरेसा धान्यपुरवठा करण्यात येत नाही आहे.
तर यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना खालील जाब विचारण्यात आले…,
लोकांना धान्यापासून वंचित ठेवण्यात यावे, असाच आदेश आला आहे का ? या महिन्याचे शंभर टक्के नियतन आले आहे का ?, आले असेल तर ते वाटप करण्यात येत का नाही ? कागदपत्रे देऊनही त्यांचे ई-प्रणाली मध्ये नावे का नाही ? शासकीय गोडाऊनमध्ये शेकडो क्विंटल धान्याची हेरा-फेरी झाली आहे. त्याची भर काढण्यासाठी तर हा प्रकार सुरू नाही ना ? असा प्रश्न त्यांनी उपस्थितांना विचारून संबंधित अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. तालुक्यातील लाभार्थ्यांना दोन ते तीन दिवसात धान्य न मिळाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्यात येईल, असा इशारा त्यांनी यावेळी दिला आहे. तसेच यावेळी कुऱ्हे पानाचे येथील सरपंच रामलाल बडगुजर, माजी सरपंच सुरेश शिंदे, ग्रामपंचायत सदस्य नारायण कोळी, ग्रामपंचायत सदस्या सुनंदा वराडे, यांच्यासह वराडसिम, सूनसगाव, शहरातील पंचशील नगर, वरणगाव, पिंपरी सेकम, आदी परिसरातील लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते .