Home प्रशासन जिल्हा परिषद पाचोरा तालुक्यातील १०० ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठी उद्या आरक्षण सोडत

पाचोरा तालुक्यातील १०० ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठी उद्या आरक्षण सोडत


पाचोरा लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पाचोरा तालुक्यातील एकूण १०० ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांचे आरक्षण निश्चित करण्यासाठी उद्या सोमवार, ८ जुलै रोजी सोडत पद्धतीने प्रक्रिया पार पडणार आहे. ही प्रक्रिया सकाळी ११ वाजता कृषिरत्न माजी आमदार कै. तात्यासाहेब आर.ओ. पाटील व्यापारी भवन, नगरपरिषद पाचोरा येथे तहसीलदार पाचोरा यांच्या अध्यक्षतेखाली सुरू होणार आहे.

महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या १३ जून २०२५ च्या राजपत्रानुसार, जळगाव जिल्ह्यातील अनुसूचित क्षेत्रातील ग्रामपंचायती वगळून इतर सर्व ग्रामपंचायतींसाठी सरपंच पदांचे वाटप अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि सर्वसाधारण या प्रवर्गांमध्ये करण्यात आले आहे. या अनुषंगाने, जळगाव जिल्हाधिकाऱ्यांच्या ११ एप्रिलच्या आदेशानुसार तालुकानिहाय आरक्षण वाटप निश्चित करण्यात आले आहे.

त्याच दिवशी, म्हणजेच सोमवारी ८ जुलै रोजी दुपारी २ वाजता, त्याच ठिकाणी उपविभागीय अधिकारी, पाचोरा भाग पाचोरा यांच्या अध्यक्षतेखाली उर्वरित प्रक्रिया पार पडेल. यामध्ये पाचोरा तालुक्यातील १०० ग्रामपंचायतींपैकी एक तृतीयांश सरपंच पदे महिलांसाठी (अनुसूचित जाती महिला, अनुसूचित जमाती महिला, नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, सर्वसाधारण महिला) आरक्षित करण्याची कार्यवाही केली जाईल.

या महत्त्वपूर्ण प्रक्रियेसाठी संबंधित ग्रामपंचायतींचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन तहसीलदार कार्यालयाकडून ग्राम महसूल अधिकारी आणि ग्रामसेवकांना पत्राद्वारे करण्यात आले आहे. या सोडतीमुळे आगामी ग्रामपंचायत निवडणुकांची दिशा स्पष्ट होणार आहे.


Protected Content

Play sound