मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | स्थानिक स्वराज्य संस्थांबाबत सुप्रीम कोर्टातील निकालाने संभ्रमाचे वातावरण असतांनाच आता जिल्हा परिषदेचे गट आणि पंचायत समितीच्या गणांच्या उद्या होणार्या आरक्षण सोडतीला राज्य निवडणूक आयोगाने स्थागिती दिली आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आल्या आहेत. यातील ९२ नगरपालिका आणि ४ नगरपंचायतींच्या निवडणुकात जाहीर झाल्या आहेत. तर जिल्हा परिषदांच्या निवडणुकीसाठी १३ जुलै २०२२ रोजी आरक्षण सोडत निघणार असल्याचे आधी जाहीर करण्यात आले होते. तथापि, आजच सुप्रीम कोर्टाने ओबीसी आरक्षणाबाबत स्पष्ट निकाल देणे टाळतांना याबाबत १९ जुलै रोजी पुन्हा सुनावणी घेणार असल्याचे जाहीर केले. तर राज्यातील निवडणुकांची जिथे प्रक्रिया सुरू झाली नसेल ते थांबविण्याचे निर्देश दिले होते.
या अनुषंगाने जिल्हा परिषदेचे गट आणि पंचायत समितींच्या गणांचे १३ जुलै रोजी निघणार्या आरक्षण सोडतीला राज्य निवडणूक आयोगाने स्थगिती दिली आहे. यात २५ जिल्हा परिषदा आणि २८४ पंचायत समित्यांमधील आरक्षणाला स्थगिती मिळाली आहे. यामुळे अद्या जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणांचे आरक्षण निघणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. अर्थात, जिल्हा परिषद निवडणूक पुढे ढकलली जाणार असल्याचेही यातून अधोरेखीत झाले आहे. तर, यात सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्देशानुसार ओबीसी आरक्षण असेल हे देखील दिसून आले आहे.