
चोपडा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चोपडा तालुक्यातील नागलवाडी गावाजवळून अवैधपणे गुरांची वाहतूक करणारे पिकअप वाहनांवर चोपडा शहर पोलीसांनी कारवाई करत १३ गुरांची सुटका केली आहे. याबाबत चोपडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


याबाबत अधिक माहिती अशी की, चोपडा तालुक्यातील नागलवाडी गावाजवळून बोलेरो पिकअप वाहन क्रमांक (एमपी ०४ जीए ४२३६) मधून बेकायदेशीरपणे गुरांची वाहतूक होत असल्याची गोपनिय माहिती पोलीस निरीक्षक मधूकर साळवे यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पथकाला कारवाईच्या सुचना दिल्या. पोलीसांनी शनिवारी २४ ऑगस्ट रोजी पहाटे ५ वाजता कारवाई करत थांबविले. यावेळी चालक हा वाहन सोडून पसार झाला होता. पोलीसांनी वाहन ताब्यात घेत दाटीवाटीने कोंबून बांधलेल्या गुरांची सुटका केली आहे. याप्रकरणी पो.कॉ प्रकाश ठाकरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार जितेंद्र सोनवणे हे करीत आहे.


