जळगाव- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव रेल्वे स्थानकावरील प्रवाशांच्या सोयी-सुविधा आणि स्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वारावरील गंभीर होत चाललेली अतिक्रमणाची समस्या सोडवण्यासाठी आता हालचाली सुरू झाल्या आहेत. मध्य रेल्वेच्या क्षेत्रीय सल्लागार समितीचे सदस्य विराज कावडीया यांनी प्रवाशांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत भुसावळ रेल्वे मंडळाचे वरिष्ठ वाणिज्य प्रबंधक अजयकुमार यांची प्रत्यक्ष भेट घेतली. या भेटीदरम्यान जळगाव रेल्वे स्थानकाच्या विकासासाठी आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी विविध मागण्यांचे सविस्तर निवेदन देऊन प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले.
जळगाव रेल्वे स्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरात मोठ्या प्रमाणावर अनधिकृत अतिक्रमण वाढले आहे. या अतिक्रमणामुळे रेल्वे प्रवाशांना आणि नागरिकांना येण्या-जाण्यासाठी मोठा अडथळा निर्माण होत असून, वाहने उभी करण्यासाठीही जागा उरलेली नाही. हे अनधिकृत अतिक्रमण धारक प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनेही धोकादायक ठरू शकतात, ही बाब निवेदनात प्रकर्षाने मांडण्यात आली. या अतिक्रमण धारकांवर महानगरपालिका आणि पोलीस प्रशासनामार्फत संयुक्त कारवाई व्हावी, यासाठी रेल्वे विभागाने स्थानिक प्रशासनाशी समन्वय साधावा, अशी मागणी करण्यात आली. यावर रेल्वे मंडळाच्या बांधकाम विभागातर्फे तातडीने समन्वय साधला जाईल, असे आश्वासन देण्यात आले.

गेल्या दीड वर्षांपासून जळगाव रेल्वे स्थानकावर बंद असलेली बॅटरी कार पुन्हा सुरू करण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली. या सेवेअभावी वृद्ध आणि दिव्यांग प्रवाशांना फलाटावर पोहोचण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. या समस्येची दखल घेत वरिष्ठ वाणिज्य प्रबंधकांनी पुढील महिन्याभरात ही बॅटरी कार सेवा पुन्हा कार्यान्वित करण्याचे आश्वासन दिले आहे. यासोबतच स्थानकावरील प्रवाशांचा वाढता भार पाहता प्लॅटफॉर्म क्रमांक २ आणि ६ वर सरकते जिने (Escalators) बसवण्याची मागणी करण्यात आली आहे, ज्यामुळे प्रवाशांचा प्रवास अधिक सुसह्य होईल.
रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने जळगाव आरपीएफ स्टेशनमध्ये महिला पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी, ही मागणीही या भेटीत लावून धरण्यात आली. तसेच, प्रवाशांच्या सोयीसाठी १२१४२ पाटलीपुत्र एक्सप्रेसला जळगाव रेल्वे स्थानकावर थांबा मिळावा, अशी आग्रही मागणी करण्यात आली. स्थानकाच्या परिसरात चार चाकी वाहनांची होणारी गर्दी लक्षात घेता स्वतंत्र चार चाकी वाहनतळ उभारण्याची गरज व्यक्त करण्यात आली. शिवाय, शिवाजीनगरच्या बाजूने असलेल्या प्लॅटफॉर्म क्रमांक ६ वर जनरल तिकीट काउंटर सुरू केल्यास नागरिकांची मोठी सोय होईल, याकडेही विराज कावडीया यांनी लक्ष वेधले. या सर्व मागण्यांवर सकारात्मक विचार करून कार्यवाही करण्याचे आश्वासन रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आले आहे.



