अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील पीकविमा योजनेतील वंचित लाभार्थ्यांना न्याय देऊन शासकीय कामात दिरंगाई करणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांवर कारवाई करा, या मागणीचे निवेदन येथील भाजपा शाखेच्या वतीने जिल्ह्याचे पालकमंत्री ना. चंद्रकांत पाटील यांना आज (दि.१८) देण्यात आले. माजी आमदार साहेबराव पाटील, पंचायत समितीच्या सभापती वजाबाई भिल, तालुका सरचिटणीस जिजाबराव पाटील, श्रीनिवास मोरे, शहराध्यक्ष शीतल देशमुख, राजेश वाघ, दीपक पाटील, महेंद्र महाजन आदीनी पालकमंत्र्यांची भेट घेऊन हे निवेदन दिले.
सदर निवेदनात म्हटले आहे की, तालुक्यातील एकूण १३७८० शेतक-यानी पिक विमा योजनेत सहभागी होत पिक विमा योजनेतील लाभार्थी हिस्यातील पिक विमा योजनेचा हप्ता विमा कंपनी कडेसादर केला होता. सद्यस्थितीत संपूर्ण तालुका शासनाकडून दुष्काळी घोषित करण्यात आला असून लाभार्थ्यांना पिक विमा योजनेचा लाभ मिळणे अपेक्षित होते. परंतु पिक विमा कंपनी कडून तालुक्यातील फक्त शिरूड महसूल मंडळातील लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला आहे .सदर कारणास्तव इतर पात्र लाभार्थ्याबाबत शासनाप्रती असंतोष निर्माण झाला आहे.
तालुक्यात सद्यस्थितीत भयावह दुष्काळी परिस्थिती असून दुष्काळामुळे शेतकयांचे उत्पन्न प्रचंड प्रमाणात वाया गेले आहे. तालुक्यात महसूल विभाग तसेच कृषी विभागाकडून न पिक विमा योजनेच्या लाभ मिळण्यासाठी आवश्यक पंचनामे करतांना मोठ्याप्रमाणात दिरंगाई करत आहेत. जिराईत शेतीचे उत्पन्न बागायती शेतीपेक्षा अधिक नमूद करणे, मनमानी पद्धतीने पिक लागवडीखालील क्षेत्र नमूद करणे, कृषी विभागाकडून बागायती पिक कापणी प्रयोग न करण्यात येणे, प्रत्यक्ष शेतात न जाता एका ठिकाणाहून पंचनामे करणे, अशा गंभीर चुका केल्या असल्यामुळे पिक विमा कंपनीकडून लाभार्थ्यांना लाभ मिळत नसल्याचे निदर्शनात आले आहे. तरी वंचित लाभार्थ्यांना आपण न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. पालकमंत्री ना पाटील यांनी त्यांना सकारात्मक कार्यवाही करण्याचे आश्वासन यावेळी दिले.