Home Cities जळगाव ITI परिसरातील कचरा संकलन केंद्र तातडीने हटवा – मनसेचा मनपाला इशारा

ITI परिसरातील कचरा संकलन केंद्र तातडीने हटवा – मनसेचा मनपाला इशारा


जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी ।  जळगाव शहरातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण केंद्र (ITI) परिसरात महानगरपालिकेच्या वतीने सुरू असलेल्या कचरा संकलन केंद्रामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आले असून, परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने हे केंद्र तातडीने बंद करण्याची जोरदार मागणी केली आहे. या मागणीस अनुसरून मनसेने मनपाला लेखी निवेदन देत अन्यथा उग्र आंदोलनाचा इशाराही दिला आहे.

ITI परिसरात असलेल्या कचरा संकलन केंद्रामुळे प्रचंड दुर्गंधी पसरत असून, माशा, डास, उंदीर यांचा त्रास वाढल्याने विद्यार्थ्यांपासून ते नागरिकांपर्यंत सर्वांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहे. या परिसरात शासकीय तंत्रनिकेतनसारखी शैक्षणिक संस्था असल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणावरही प्रतिकूल परिणाम होत असल्याचे मनसेने निदर्शनास आणून दिले आहे. कचऱ्यामुळे होणाऱ्या दुर्गंधीने विद्यार्थ्यांचे लक्ष विचलित होत असून, त्यांचे शिक्षणाचे मूलभूत हक्कही धोक्यात आले असल्याची भूमिका मनसे पदाधिकाऱ्यांनी मांडली.

मनसेच्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, हे केंद्र सार्वजनिक आरोग्य अधिनियम 1949 आणि पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986 च्या नियमांचे उल्लंघन करते. शिवाय, “स्वच्छ भारत अभियान” अंतर्गत शहर स्वच्छतेसाठी सरकारने घेतलेल्या भूमिकेला हे केंद्र विरोधात जाणारे असल्याचेही म्हटले आहे. अशा गलिच्छ कचरा केंद्रामुळे शहराच्या सौंदर्यावरही परिणाम होतो आणि नागरिकांच्या मनात नाराजी निर्माण होते, असे मतही निवेदनात व्यक्त करण्यात आले.

मनसेने असेही नमूद केले की, मनपाकडे यापूर्वीही अनेक वेळा या केंद्राबाबत तक्रारी करण्यात आल्या होत्या. मात्र, मनपाकडून ठोस कार्यवाही झाली नाही. १ सप्टेंबरपासून शहर स्वच्छतेचे काम नव्या एजन्सीकडे दिले जात असल्याने, या एजन्सीलाही लेखी सूचना दिली जाईल आणि ITI परिसरातील कचरा संकलन केंद्र कायमस्वरूपी बंद ठेवण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा कायदेशीर लढ्याची आणि तीव्र आंदोलनाची तयारी असल्याचा स्पष्ट इशाराही मनसेने दिला.

या वेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष ॲड. जमील देशपांडे, महानगर अध्यक्ष किरण तळले, उपमहानगर अध्यक्ष श्रीकृष्ण मेंगळे, तसेच ललित शर्मा, राजेंद्र निकम, प्रकाश जोशी, वाहतूक सेनेचे जिल्हा संघटक रज्जाक सय्यद, शेतकरी सेनेचे जिल्हा संघटक अविनाश पाटील, संदीप मांडोळे, ॲड. सागर शिंपी, संजय मोती, विकास पाथरे, भूषण ठाकूर यांच्यासह महिला सेनेच्या पदाधिकारी अनिता कापुरे, लक्ष्मी मोरे, लताबाई पाथरवट, नजमा तडवी आदी उपस्थित होते.


Protected Content

Play sound