जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | भुसावळ तालुक्यातील साकेगाव येथील तत्कालीन ग्रामसेवकावर भ्रष्टाचाराचे आरोप असतांना देखील त्यांच्याकडेच पुन्हा ग्रामसेवकपदाचा प्रभार देण्यात आला असून या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते प्रमोद पाटील यांनी जिल्हा परिषद प्रशासनाला निवेदन देत आत्मदहनाचा इशारा दिला आहे.

साकेगाव येथील सामाजिक कार्यकर्ते प्रमोद पाटील यांनी जि.प. सीईओ यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, साकेगाव ग्रामपंचायतमध्ये मागील एक वर्षभरामध्ये १५ वा देण्यामध्ये ४० ते ५० लाख रूपयांचा भ्रष्टाचार झाला असून या संदर्भात आपण स्वत: १५ ऑगस्ट रोजी उपोषणास बसलो होते. तेव्हा शासनाने वरिष्ठ पातळीवरून चौकशीचे निर्देश दिले. या चौकशी समितीने अपूर्ण व दिशाभूल करणारी माहितीचा अहवाल आपल्याकडे पाठविला आहे. या संदर्भात मी आपणांस दि. ०३,/१०,/२०२३ रोजी पत्र पाठवून चौकशी चुकीच्या पध्दतीने सुरू असल्याचे कळविले.
दरम्यान, संबंधीत चौकशी पूर्ण होवून आपल्याकडे आलेली असून त्या चौकशीमध्ये उपमुख्य कार्यकारी अधिकारी भरत कोसोदे यांचे संबंधीत अधिकारी हे आप्त असल्याने तसेच राजकीय दबावातून त्यांनी त्रुटी ठेवल्या आहेत. यामुळे सदर अहवाल प्रकरणी चौकशी करण्यात यावी अशी मागणी प्रमोद पाटील यांनी या निवेदनात केली आहे.
तसेच, एकीकडे चौकशी अहवालात मुद्दाम त्रुटी ठेवण्यात आल्या असतांनाच दुसरीकडे साकेगाव ग्रामपंचायतीचा कार्यभार हा पुन्हा एकदा प्रीतम रघुनाथ शिरतुरे यांच्याकडे देण्यात आला आहे. म्हणजे ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप आहे, त्यांच्याकडेच साकेगावचा प्रभार देण्यातून बीडीओ हे नेमके काय साध्य करत आहेत ? यामुळे त्यांच्याकडी कार्यभार न काढल्यास आपण १ जानेवारी २०२४ रोजी भुसावळच्या बीडीओ कार्यालयात आत्मदहन करणार असल्याचा इशारा प्रमोद पाटील यांनी या निवेदनात दिला आहे.