सत्तार यांची शिवसेनेतून हकालपट्टी करा – खैरे

khaire and sattar

औरंगाबाद, वृत्तसंस्था | जिल्ह्यातील राजकारणात वर्चस्व टिकवण्यासाठी राज्यमंत्रिपदाचा राजीनामा देणारे सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांच्यावर शिवसेनेचे नेते व माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. ‘अब्दुल सत्तार गद्दार आहेत. त्यांना शिवसेनेतून हाकलून लावा. ‘मातोश्री’ची पायरी चढू देऊ नका,’ अशी विनंती त्यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना केली आहे.

 

औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडी व भाजपला समसमान मते पडल्याने तिथे चिठ्ठी उडवली गेली. त्यात महाविकास आघाडीच्या मीना शेळके यांची निवड झाली. मात्र, उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपचे एल.जी. गायकवाड विजयी झाले. त्यामुळे चंद्रकांत खैरे संतप्त झाले आहेत. अब्दुल सत्तार यांच्या दगाबाजीमुळे उपाध्यक्षपदी भाजपचा विजय झाला, असा आरोप खैरे यांनी पत्रकारांशी बोलताना केला. ‘सत्तार यांना मंत्रिपदावर राहण्याचा अधिकार नाही,’ असे खैरे यांनी म्हटले आहे.

जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत सत्तार यांनी वेगळी भूमिका घेतल्याने मी शिवसेनेचा नेते म्हणून त्यांना समजावण्यासाठी गेलो होतो. मात्र, ते आमच्यासमोर शिवसेनेबद्दल वेडेवाकडे बोलले. तुमच्या शिवसेनेचे जिल्हा परिषदेत आहेच काय?, मी राजीनामा उद्धव ठाकरेंसमोर फेकला आहे, असे ते म्हणाले. अशा माणसाला शिवसेनेत राहण्याचा अधिकार नाही. संपूर्ण प्रकरणाबाबत मी पक्षप्रमुखांसोबत बोलणार आहे. ‘आम्ही वर्षानुवर्षं कष्ट घेऊन इथे संघटना वाढवली. हा कोण टिकोजीराव आम्हाला शिकवणार ? असले गद्दार पक्षात घेऊन काय फायदा ? डोणगावकर यांनाही पक्षाने असेच घेतले. त्यांना पदे दिली आणि त्या निघून गेल्या. आता या सत्तारांनाही भाजपमध्येच जाऊ द्या,’ असे मी उद्धव ठाकरे यांना सांगणार आहे. ‘अब्दुल सत्तार यांच्याशी पक्षप्रमुखांनी चर्चा वगैरे करण्याची अजिबात गरज नाही. त्यांना ‘मातोश्री’ची पायरी चढण्याचाही अधिकार नाही,’ असेही खैरे म्हणाले.

Protected Content