चाळीसगाव (प्रतिनिधी) येथील नागद रोड चौफुली ते स्वामी समर्थ नगरपर्यंत रस्त्याच्या दुतर्फा असलेले अतिक्रमण रस्ता रुंद करण्यासाठी काढण्याचे काम येथील नगरपालिकेने सुरू केले आहे. हे काम युद्धपातळीवर सुरू असल्याने नागद रोड मोकळा श्वास घेताना दिसून येत आहे.
चाळीसगाव कडून नागद-बनोटी-सोयगाव या मोठ्या गावांकडे जाणारा रस्ता रूंदीकरण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सुरू असून शहराबाहेर या रस्त्याचे काम बऱ्यापैकी पूर्ण झाले आहे. आता शहरात हे काम करावयाचे असल्याने नागद रोडवरील २० मीटर रुंदीच्या आतील दुकाने व रहिवास असलेली घरे न.पा. मार्फत हटवली जात आहेत. यात जवळपास ७० दुकाने व घरे यांचा समावेश असल्याचे नगरपालिकेमार्फत सांगण्यात आले आहे. न.पा. मुख्याधिकारी अनिकेत मनोरकर, अभियंता राजेंद्र पाटील, आरोग्य विभागाचे निरीक्षक तुषार नकवाल, भूषण लाटे, संजय गोयर या अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली १५ कर्मचारी या ठिकाणी काम करीत आहेत. नागद रोडवरील हे अतिक्रमण पूर्णपणे दूर झाल्यानंतर हा रस्ता मोकळा श्वास घेईल यात शंका नाही.