बुलढाणा – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । बुलढाणा जिल्ह्याचे नवनियुक्त सहपालकमंत्री तथा वस्त्रोद्योगमंत्री ना. संजय सावकारे यांनी गुरुवारी जिल्ह्यातील विविध शासकीय योजनांचा आणि विकास प्रकल्पांचा सखोल आढावा घेतला. जिल्हाधिकारी कार्यालयातील जिजाऊ सभागृहात आयोजित बैठकीत त्यांनी प्रशासनाला स्पष्ट निर्देश दिले की, “जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व विभागांनी समन्वय साधून काम करावे आणि योजनांची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करावी.”
या बैठकीला जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात, पोलीस अधीक्षक निलेश तांबे, मुख्य वनसंरक्षक सरोज गवस, अपर जिल्हाधिकारी सुधीर खांदे, निवासी उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार यांच्यासह उपविभागीय अधिकारी आणि विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. बैठकीच्या प्रारंभी सहपालकमंत्र्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांचा व्यक्तिगत परिचय घेत प्रशासनाशी थेट संवाद साधण्यावर भर दिला.

सहपालकमंत्र्यांनी या बैठकीत जिल्ह्याच्या सर्वसामान्य माहितीपासून ते महत्त्वाच्या प्रकल्पांपर्यंत सविस्तर आढावा घेतला. पाऊसमान, अतिवृष्टीमुळे झालेलं नुकसान, पंचनामे आणि मदत वितरण, चालू हंगामातील पीक पेरणी, फळबाग लागवड, पीक विमा यासारख्या कृषी विषयांवर त्यांनी सखोल चर्चा केली. तसेच जिल्हा वार्षिक योजना, पर्यटन विकास, लोणार व सिंदखेडराजा विकास आराखडा, जिगाव सिंचन प्रकल्प आणि डोंगरी भागातील विशेष अडचणींचाही त्यांनी बारकाईने अभ्यास केला.
जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी या वेळी सादरीकरणाच्या माध्यमातून जिल्ह्यातील विविध विकासकामांची सद्यस्थिती, अंमलबजावणीची गती, आणि अडचणींची माहिती दिली. यावर ना. सावकारे यांनी आवश्यक ते ठोस निर्णय घेण्याचे निर्देश दिले.
या बैठकीत पर्यटन क्षेत्राचा विकास, सिंचन प्रकल्पांची प्रगती, कृषी क्षेत्रातील आव्हाने आणि उपाययोजना, तसेच ग्रामविकासाशी संबंधित योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीवर खास भर दिला गेला. सहपालकमंत्री म्हणून पहिल्याच जिल्हा दौऱ्यात ना. सावकारे यांनी प्रशासकीय यंत्रणेला स्पष्ट संदेश दिला की, “जनतेच्या अपेक्षांची पूर्तता करणे हीच आपल्या जबाबदाऱ्यांची खरी कसोटी आहे.”



