फैजपूर ता. यावल प्रतिनिधी । संपूर्ण महाराष्ट्राचे दैवत असलेल्या पांडुरंगाच्या पंढरपूर वारीची शेकडो वर्षापासूनची परंपरा खंडित करण्याचा घाट सत्तारूढ शासनाने घातला असून याचा अखिल भारतीय संत समिती, अखिल भारतीय सनातन सत्पंथ, स्वामीनारायण पंथ, महानुभाव पंथ, दिगंबर महाराज संस्थान, वारकरी संप्रदाय, विश्व हिंदू परिषद व बजरंग दल तीव्र शब्दात निषेध व्यक्त करत असून दि.१७ जुलै रोजी सर्व तहसील कार्यालयासमोर भजन आंदोलन करणार आहे, असे अखिल भारतीय संत समितीचे राष्ट्रीय खजिनदार महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
आज दुपारी दोन वाजता सतपंथ मंदिर संस्थान या ठिकाणी पत्रकार परिषद घेण्यात आली. या पत्रकार परिषदेत अखिल भारतीय संत समिती कोषाध्यक्ष हामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज, अखिल भारतीय संत समिती सदस्य तथा खंडोबा देवस्थानचे गादीपती महामंडलेश्वर पुरूषोत्तम दासजी महाराज, महानुभाव पंथाचे सुरेश शास्त्री मानेकर बाबा, स्वामीनारायण गुरुकुल संस्थांचे उपाध्यक्ष शास्त्री भक्ती किशोर दासजी, दिगंबर महाराज संस्थान अंजाळे येथील ह भ प धनराज महाराज ह-भ-प नरेंद्र नारखेडे, विश्व हिंदू परिषदेचे कायम कार्यकर्ते धोंडू अण्णा माळी, विश्व हिंदू परिषदेचे नारायण घोडके, विनोद उबाळे, भुसावळ जिल्हा मंत्री योगेश भंगाळे, एडवोकेट कालिदास ठाकूर, बजरंग दल शहराध्यक्ष लोकेश कोल्हे यांची उपस्थिती होती. कोरोनाच्या महाभयंकर लाटेत पंढरपूर पोटनिवडणूक झाली यावेळी राजकीय पदाधिकाऱ्यांसह हजारो लोकांची गर्दी तेथे होती मात्र त्यावेळी शासनाने कोणतेही बंधन घातले नाही. आज देशात सर्वत्र जन जीवन सामान्य होत असून हॉटेल्स, मॉल, दारूची दुकाने, बाजारपेठा, लग्न समारंभ, सरकारी जाहीर कार्यक्रम सर्रासपणे सुरू असताना शेकडो वर्षापासूनची, लाखो शिस्तप्रिय वारकऱ्यांची पांडुरंगाची पंढरपूर पायी वारीची प्रथा शासन बंद करीत असून याचा आम्ही सर्व संत जाहीर निषेध करतो. हा फक्त वारकरी संप्रदाय यावरच नाही तर अखंड हिंदू धर्मावर आघात आहे असे सर्व संतांचे मत आहे. असे महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांनी सांगितले.
स्वामीनारायण संस्थांचे उपाध्यक्ष शास्त्री भक्ती किशोर दासजी यांनी शासनाचा निषेध करून हिंदूंचे श्रद्धा स्थान असलेले पांडुरंग अठ्ठावीस युगापासून महाराष्ट्र भूमी उभे आहे. युगानुयुगापासून महाराष्ट्राच्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या पायी दिंडी खंडित करणे हे भविष्यासाठी घातक ठरेल. याचे भविष्यात दुष्परिणाम भोगावे लागतील याला कोण जबाबदार राहणार ? असा प्रश्न उपस्थित करून ‘ वारी बंद मात्र बाकी सर्व चालू ‘ या शासनाच्या अजब कारभाराचा निषेध व्यक्त केला.
खंडोबा देवस्थानचे गादीपती तथा अखिल भारतीय संत समिती सदस्य महामंडलेश्वर पुरूषोत्तम दासजी महाराज यांनी शासनाच्या या कृत्याचा निषेध व्यक्त करून देशात सर्वदूर निवडणुका, स्वागत, सत्कार, आदी कार्यक्रम होत असून महाराष्ट्र सरकारची बुद्धी भ्रष्ट झाली आहे. त्यांना पांडुरंग सदबुद्धी देवो अशी प्रार्थना केली. तर महानुभाव पंथाचे सुरेश शास्त्री मानेकर बाबा यांनी शासनाने काही बंधने घालून वारीला परवानगी द्यावी अन्यथा याचे परिणाम सर्वांनाच भोगावे लागतील. मोगल साम्राज्यात वारी बंद करण्याचा पहिला प्रयत्न औरंगजेबाने केला होता आणि आता हाच प्रयत्न महाराष्ट्र शासन करीत आहे. हा संपूर्ण हिंदूंचा अपमान असून समस्त संत गण यामुळे दुःखी झाले आहेत. पांडुरंगाची पंढरपूर वारी बंद करून समस्त वारकरी संप्रदायावर शासनाने हा हल्ला केलेला असल्याचे मत ह भ प धनराज महाराज यांनी व्यक्त करून शासनाचा निषेध केला.
दिगंबर महाराज मठ पंढरपूरचे अध्यक्ष नरेंद्र नारखेडे यांनी वारकऱ्यांवर शासनाने वारी बंद करून अपमान केला आहे. गेल्या एकादशीला १८० वारकऱ्यांना २००० पोलीस बंदोबस्तासाठी देण्यात आले इतिहासात असे पहिल्यांदा घडले. ज्याच्या हाती टाळ मृदंग त्यांच्यावर नजर ठेवण्यासाठी दोन हजार पोलीस बंदोबस्त. उद्धवा अजब तुझे सरकार असे म्हणण्याची वेळ आली आहे. आम्ही वारकरी याचा निषेध करतो. सर्व धर्माच्या संतांनी शासनाचा निषेध व्यक्त करून येत्या १७ जुलैला शांततेच्या मार्गाने भजन आंदोलन करण्याचे ठरविले आहे. शासनाने या आंदोलना आधीच वारकऱ्यांच्या तसेच महाराष्ट्रातील तमाम हिंदुंच्या श्रद्धेचा भाग असलेल्या वारीला परवानगी देऊन मार्ग काढावा असे आवाहन उपस्थित संतांनी केले आहे.
व्हिडीओ लिंक :-
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/501269610976735