यावल प्रतिनिधी । टिकटॉक म्यूझिकली अॅपवर धार्मिक भावना दुखावणारा बनवलेला व्हिडीओ सोशल मीडियावर टाकल्याने येथे मध्यरात्रीच्या सुमारास तणाव निर्माण झाला होता. या प्रकरणी आज पहाटे तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करत संशयिताना अटक करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, टिकटॉक म्यूझिकली या अॅपवर एका धर्माच्या भावना दुखावणारी क्लिप शहरातील सागर राजेंद्र बारी, सौरभ ऊर्फ मुन्ना किशोर भोईटे, शुभम मिलिंद सांगवीकर (सर्व रा. भोईटे गल्ली, सरस्वती मंदीर शाळेसमोर, यावल) या तिघांनी टिकटॉक म्यूझिकली अॅपवर धार्मिक भावना दुखावतील असा एक व्हिडीओ तयार करून सोशल मिडीयावर प्रसारित केला होता. या व्हिडीओमध्ये काही आक्षेपार्ह संवाद देखील बोलण्यात आले होते. त्यानुसार युवकांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी मंगळवारी पोलिस ठाण्यात सुमारे दोन तास शेकडो नागरिकांनी ठिय्या आंदोलन करत कारवाईची मागणी केली होती. प्रभारी पोलिस निरीक्षक सुजित ठाकरे यांनी संबंधितावर कडक कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर मध्यरात्री हा तणाव निवळला होता.
आज पहाटे ५ वाजेच्या सुमारास मोहम्मद अकील अब्दुल खालीक (वय २० वर्ष, व्यवसाय गवंडी काम, रा. डांगपूरा, मदीना मज्जीत जवळ, यावल) यांच्या फिर्यादीवरून गुरनं व कलम भाग ५ गु.र.नं. ८६/२०१९ भा.दं.वि.क. २९५(अ),३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिघं संशयिताना अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे सायंकाळीच येथील पोलीस स्थानकातर्फे सोशल मिडीयावरील अफवा, धार्मीक भावना दुखावणार्या पोस्ट आदींमुळे शहरात तणाव निर्माण होवू नये म्हणून सर्वधर्मीय नागरीकांची शांतता समितीची बैठक आयोजीत केली होती. बैठक संपून दोन तासही होत नाहीत तोवर ही घटना घडली.