जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जामनेर तालुक्यात मंगळवारी १६ सप्टेंबर रोजी मध्यरात्री २ ते पहाटे ५ वाजेच्या दरम्यान झालेल्या ढगफुटीसदृश्य पावसामुळे मोठी हानी झाली आहे. या गंभीर परिस्थितीची दखल घेत राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी तात्काळ जळगाव जिल्ह्याचा दौरा केला. मंगळवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास ते मुंबईहून थेट जामनेरमध्ये दाखल झाले. आपल्या मतदारसंघातील नेरी, वाकडी, शेंदुर्णी आणि तोंडापूर येथील नुकसानग्रस्त भागाची त्यांनी पाहणी केली. नेरी, वाकडी, शेंदुर्णी आणि तोंडापूर या गावांमध्ये सर्वाधिक फटका बसला असून, अनेक घरांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले आहे. यामुळे स्थानिकांची गैरसोय झाली असून, त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

या अतिवृष्टीमुळे शेतीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी शेतांमध्ये पाणी साचल्याने उभी पिके पाण्याखाली गेली आहेत. यामुळे आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांवर दुहेरी संकट कोसळले आहे. पावसाचे पाणी अनेक ठिकाणी गुडघाभर साचल्याने दळणवळणातही अडथळा निर्माण झाला आहे. यावेळी त्यांच्यासोबत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. महाजन यांनी थेट ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

पाहणीदरम्यान, मंत्री गिरीश महाजन यांनी परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन आपत्ती व्यवस्थापन विभागातील अधिकाऱ्यांना तात्काळ मदतकार्य सुरू करण्याचे आदेश दिले. तसेच, नुकसानीचा पंचनामा करून पूरग्रस्तांना आणि शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत पोहोचवण्याचे निर्देश दिले. त्यांच्या या तातडीच्या दौऱ्यामुळे स्थानिक नागरिकांना दिलासा मिळाला असून, शासनाकडून लवकरच मदत मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.



