जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पंतप्रधान किसान सन्मान निधी (पी.एम.किसान) योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात विसाव्या हप्त्याचे वितरण करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसी येथून ऑनलाईन पद्धतीने या निधीचे वितरण केले. या अनुषंगाने, शनिवारी, २ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात कृषी विभाग, जळगावच्या वतीने एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री रक्षाताई खडसे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांनी माहिती दिली की, पी.एम.किसान योजनेच्या या विसाव्या हप्त्यातून जळगाव जिल्ह्यातील ४ लाख २३ हजारांहून अधिक शेतकऱ्यांना एकूण ८४ कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात येत आहे. यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा आर्थिक आधार मिळणार आहे.

जिल्हा नियोजन भवनात आयोजित या कार्यक्रमात खासदार स्मिताताई वाघ, आमदार राजूमामा भोळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुरबान तडवी यांच्यासह कृषी विभागाचे अनेक अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुरबान तडवी यांनी याप्रसंगी बोलताना सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डीबीटी प्रणालीद्वारे एका क्लिकवर शेतकरी सन्मान निधीचा हा विसावा हप्ता वितरित केला आहे. याचा लाभ थेट जळगाव जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना मिळणार आहे.



