Home Cities अमळनेर शेतकऱ्यांना दिलासा! अमळनेरमध्ये अखेर शासकीय कापूस खरेदी केंद्राला मंजुरी

शेतकऱ्यांना दिलासा! अमळनेरमध्ये अखेर शासकीय कापूस खरेदी केंद्राला मंजुरी


अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेरच्या शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. अनेक वर्षांच्या मागणीनंतर आणि सततच्या पाठपुराव्यानंतर अमळनेर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी शासकीय कापूस खरेदी केंद्र (सीसीआय) सुरू करण्यास अखेर मंजुरी मिळाली आहे. गेल्या वर्षी हे केंद्र न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला होता. यावर्षी मात्र, बाजार समितीचे सभापती अशोक पाटील यांच्या प्रयत्नांमुळे आणि आमदार अनिल पाटील व खासदार स्मिता वाघ यांच्या सहकार्यामुळे हे शक्य झाले आहे. कापूस महामंडळाने सीसीआय केंद्राच्या यादीत अमळनेरचे नाव समाविष्ट केल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

गेल्या वर्षी झाले होते मोठे नुकसान
गेल्या वर्षी अमळनेर तालुक्याला सीसीआय केंद्र मिळाले नव्हते, त्यामुळे शेतकऱ्यांना आपला कापूस खासगी बाजारात कमी दराने विकावा लागला होता. प्रति क्विंटल १५०० ते १६०० रुपयांनी कमी भाव मिळाल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले होते. काही शेतकऱ्यांना तर आपला कापूस विक्रीसाठी जवळच्या तालुक्यात जावे लागले, ज्यामुळे त्यांना वेळ आणि पैशाचाही भुर्दंड सोसावा लागला. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठी नाराजी पसरली होती. यावर्षी हे केंद्र सुरू झाल्याने शेतकऱ्यांना त्यांच्या कापसाला योग्य भाव मिळेल आणि त्यांचे मोठे आर्थिक नुकसान टळेल.

‘कपास किसान’ ॲपवर नोंदणी आवश्यक
यावर्षी, शासकीय दराने कापूस विकण्यासाठी शेतकऱ्यांनी ‘कपास किसान’ ॲपवर आपली नोंदणी करणे अनिवार्य आहे. बाजार समितीचे सभापती अशोक पाटील यांनी शेतकऱ्यांना ३० सप्टेंबरपर्यंत आपला कापूस पेरा, सातबारा उतारा आणि अपडेटेड आधारकार्डची माहिती भरून नोंदणी करण्याचे आवाहन केले आहे. ही नोंदणी न केल्यास शेतकऱ्यांचा कापूस शासकीय भावात खरेदी केला जाणार नाही. शेतकरी स्वतःच आपल्या मोबाईलवरून गुगल प्ले स्टोअरमधून ‘कपास किसान’ ॲप डाउनलोड करून नोंदणी करू शकतात, त्यामुळे त्यांना इतरत्र जाण्याची गरज पडणार नाही.


Protected Content

Play sound