मुंबई प्रतिनिधी । रिलायन्स जिओ देशात फाईव्ह-जी सेवा सुरू करणार असल्याची घोषणा कंपनीचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी वार्षिक सर्वसाधारण बैठकीत केली.
रिलायन्स कंपनीची वार्षिक सर्वसाधारण सभा आज व्हर्च्युअल या पध्दतीत पार पडली. यात कंपनीचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी गत वर्षात कंपनीने केलेल्या प्रगतीचा आलेख प्रस्तुत केला. ते म्हणाले की, यंदा आलेल्या कोरोनाच्या आपत्तीमुळे अर्थव्यवस्थेवर अतिशय विपरीत परिणाम झालेला आहे. तथापि, अशा स्थितीतही रिलायन्सने आपली प्रगती सुरूच ठेवली आहे. कंपनीच्या विविध सेवांनी समाधानकारक कामगिरी केली आहे. यात अगदी अलीकडेच सादर करण्यात आलेल्या जिओमीट या अॅपला फक्त दोन महिन्यात तयार करण्यात आले असून याचे काही दिवसांमध्येच ५० लाख पेक्षा जास्त डाऊनलोड झाल्याची माहिती त्यांनी दिली. जिओमध्ये फेसबुक व गुगल सारख्या मातब्बर कंपन्यांसह २० अन्य कंपन्यांनी गुंतवणूक केल्याची माहिती देखील त्यांनी दिली.
याप्रसंगी मुकेश अंबानी यांनी रिलायन्स कंपनीने स्वत:चे फाईव्ह जी नेटवर्क तंत्रज्ञान विकसित केले असून ही सेवा लवकरच लाँच करण्यात येणार असल्याची माहिती दिली. देशात सध्या फाईव्ह जी नेटवर्क नसून ते उपलब्ध होताच हे नेटवर्क ग्राहकांना सादर करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. यामुळे भारतातच नव्हे तर जगातील अनेक देशांमध्ये जिओचा विस्तार होणार असल्याचा दावा त्यांनी केला.