Home Cities जळगाव ना. गिरीश महाजन यांच्याहस्ते वंदे मातरम @१५० दिनदर्शिकेचे प्रकाशन

ना. गिरीश महाजन यांच्याहस्ते वंदे मातरम @१५० दिनदर्शिकेचे प्रकाशन


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । भारतीय स्वातंत्र्यलढ्यात क्रांतीची मशाल पेटवणाऱ्या आणि देशभक्तीची ऊर्जा देणाऱ्या ‘वंदे मातरम’ या राष्ट्रमंत्राला १५० वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर जळगावमध्ये एक ऐतिहासिक आणि प्रेरणादायी सोहळा पार पडला. भाजप जिल्हा सरचिटणीस डॉ. केतकीताई पाटील यांनी निर्मित केलेल्या ‘वंदे मातरम @१५०’ या विशेष दिनदर्शिकेचे प्रकाशन राज्याचे ग्रामविकास व आपत्ती व्यवस्थापन मंत्री ना. गिरीश भाऊ महाजन यांच्या हस्ते करण्यात आले.

जळगाव येथील जी.एम. फाउंडेशनमध्ये शनिवार, २७ डिसेंबर २०२५ रोजी हा प्रकाशन सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. देशभक्ती, राष्ट्रीय एकात्मता आणि स्वातंत्र्यलढ्याच्या स्मृतींना उजाळा देणाऱ्या या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरिक, भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

या प्रसंगी व्यासपीठावर ना. गिरीश भाऊ महाजन यांच्यासह आमदार राजू मामा भोळे, आमदार मंगेश दादा चव्हाण, डॉ. राजेंद्रजी फडके, माजी महापौर नितीनजी लढा, जळगाव महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, जळगाव जिल्हा पश्चिम जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी, भाजपा जळगाव जिल्हा पूर्वचे सरचिटणीस डॉ. केतकी पाटील, पणन महासंघाचे उपाध्यक्ष रोहित निकम आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रकाशन सोहळ्याप्रसंगी बोलताना ना. गिरीश भाऊ महाजन यांनी ‘वंदे मातरम’ या गीताचे ऐतिहासिक महत्त्व विशद केले. ते म्हणाले की, वंदे मातरम हे गीत आजही प्रत्येक भारतीयाच्या मनात देशभक्ती आणि राष्ट्रीय एकात्मतेची भावना जागृत करते. देशाच्या प्रगतीसाठी, संरक्षणासाठी आणि एकजुटीची प्रेरणा देणारे हे गीत केवळ शब्दांपुरते मर्यादित नसून, ते एक विचार आणि चैतन्य आहे.

‘वंदे मातरम @१५०’ या दिनदर्शिकेमध्ये या राष्ट्रमंत्राची निर्मिती, त्यामागील ऐतिहासिक पार्श्वभूमी, त्या काळातील सामाजिक व राजकीय परिस्थिती यांची माहिती प्रभावीपणे मांडण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. प्रत्येक घरात असावी अशी ही दिनदर्शिका असून ती नव्या पिढीपर्यंत देशभक्तीचा संदेश पोहोचविण्यास उपयुक्त ठरेल, असे गौरवोद्गार ना. गिरीश महाजन यांनी काढले.

डॉ. केतकीताई पाटील यांनी या दिनदर्शिकेच्या निर्मितीमागील उद्देश स्पष्ट करताना, वंदे मातरमच्या १५० वर्षांचा प्रवास समाजापर्यंत पोहोचवणे आणि राष्ट्रप्रेमाची भावना अधिक दृढ करणे हा मुख्य हेतू असल्याचे सांगितले. उपस्थित मान्यवरांनी या उपक्रमाचे कौतुक करत, तो प्रेरणादायी असल्याचे मत व्यक्त केले.

एकूणच, ‘वंदे मातरम @१५०’ दिनदर्शिकेच्या प्रकाशनाने जळगावमध्ये देशभक्तीचे वातावरण निर्माण झाले असून, स्वातंत्र्यलढ्याच्या मूल्यांची आठवण करून देणारा हा उपक्रम समाजासाठी दिशादर्शक ठरेल, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.


Protected Content

Play sound