मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते संविधान दिनदर्शिकेचे विमोचन

प्रदेश उपाध्यक्षा डॉ. केतकी पाटील यांच्या संकल्पनेतून हर घर संविधान उपक्रम

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भाजपाच्या महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्षा डॉ. केतकीताई पाटील यांच्या संकल्पनेतून हर घर संविधान हा उपक्रम राबविला जात आहे. या उपक्रमांतर्गत तयार करण्यात आलेल्या संविधान दिनदर्शिकेचे मुंबई येथे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपस्थित मंत्र्यांच्या हस्ते विमोचन करण्यात आले.

गोदावरी फाउंडेशनच्या संचालिका तथा भाजपा महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा डॉ. केतकी पाटील यांच्या संकल्पनेतून गतवर्षी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्यकाळातील प्रत्येक घटना अन् प्रसंगांची माहिती देणार्‍या दिनदर्शिकेचे वितरण करण्यात आले होते. यंदा संविधानाचे अमृतमहोत्सव साजरे केले जात असल्याने डॉ. केतकी पाटील यांच्या संकल्पनेतून हर घर संविधान हे ब्रीद घेऊन यंदा संविधान दिनदर्शिका तयार करण्यात आली आहे. डॉ. केतकी पाटील यांनी तयार केलेल्या या दिनदर्शिकेचे विमोचन मुंबई येथे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह जलसंपदा मंत्री ना. गिरीश महाजन, अन्न व नागरी पुरवठा मंत्री ना. धनंजय मुंडे, पर्यटन व खाण स्वातंत्र्य सैनिक कल्याण मंत्री ना. शंभुराज देसाई, सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. शिवेंद्रराजे भोसले, उच्च तंत्र शिक्षण मंत्री ना. चंद्रकांत पाटील, वस्त्रोद्योग मंत्री ना. संजय सावकारे यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपस्थित मंत्र्यांनी संविधान दिनदर्शिकेचे अवलोकन करून डॉक्टर केतकी पाटील यांच्या या उपक्रमाचे कौतुक केले.

कोट….
प्रत्येक घरात संविधानाची माहिती पोहचविणार
संविधान दिनदर्शिका 2025 यामध्ये संविधान निर्मीतीपासून ते संविधानात आत्तापर्यंत झालेल्या सुधारणा, घटना, प्रसंग यांची सर्वसामान्यांच्या ज्ञानात भर टाकणारी परिपूर्ण माहिती देण्यात आली आहे. दिनदर्शिकेच्या माध्यमातून हर घर संविधान हा संदेश सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचविण्याचा मानस असल्याचे भाजपा महिला प्रदेश उपाध्यक्षा डॉ. केतकीताई पाटील यांनी सांगितले.

संविधान जागृती होण्यास सहाय्य

या दिनदर्शिकेत क्यू आर कोड उपलब्ध असून त्याला स्कॅन केल्यास संविधान आपणास उपलब्ध होते. भारतीय संविधानाला यावर्षी 75 वर्षे होत आहेत. राज्यघटनेचा आत्मा भारतीय नागरिक असून भारतीय नागरिकत्वाचा आत्मा भारतीय संविधान आहे. संविधान निर्मिती बरोबरच त्याचे भारतीयत्व, उद्देशिकेत बदलाचा इतिहास असे बारा महिन्यांचे बारा विषय वाचकांना समजतील अशा भाषेत अंतर्भूत करण्यात आले आहे. केंद्र सरकारने नुकतेच हे वर्ष संविधान पर्व म्हणून घोषित केले तर राज्य सरकारने हे घरघर संविधान कार्यक्रम घोषित केला आहे. या दिनदर्शिकेच्या माध्यमातून जनतेमध्ये संविधान जागृती होण्यास सहाय्य होणार आहे.

Protected Content