दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा । भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या पहिल्या भाजप मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. दिल्लीच्या रामलीला मैदानात पार पडलेल्या या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्यासह विविध राज्यांचे मुख्यमंत्री आणि भाजपचे वरिष्ठ नेते उपस्थित होते. दिल्ली विधानसभेवर तब्बल २७ वर्षांनंतर भाजपने सत्ता मिळवली आहे. रेखा गुप्तांनी आम आदमी पक्षाच्या वंदना कुमारी यांचा २९ हजार ५९५ मतांनी पराभव करत शालीमार विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवला. त्यांच्यासह उपमुख्यमंत्री परवेश शर्मा आणि ६ मंत्र्यांनी पदाची शपथ घेतली. दिल्लीचे नायब राज्यपाल विनयकुमार यांनी सर्व मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.
भाजपच्या धक्कातंत्रामुळे मुख्यमंत्रीपदी रेखा गुप्ता
दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदासाठी गेल्या १० दिवसांपासून विविध नावांची चर्चा सुरू होती. त्यामुळे, भाजप कोणत्या नेत्याला जबाबदारी देणार याकडे संपूर्ण देशाचे लक्ष होते. अखेर, भाजपने धक्कातंत्र वापरत रेखा गुप्ता यांना भाजप आमदारांचा गटनेता जाहीर केले आणि सकाळी त्यांच्या शपथविधीला अंतिम स्वरूप देण्यात आले. संघ विचारधारेतून आलेल्या रेखा गुप्ता यांनी शालेय जीवनापासून भाजप आणि संघ परिवारात काम केले आहे. त्या सध्या भाजप महिला मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष असून, विद्यार्थी संघटनेपासून त्यांची पक्षाशी जोडणी आहे. त्यामुळेच, भाजपने नवख्या आमदारांवर विश्वास दाखवत दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली आहे.
रेखा गुप्ता यांचा राजकीय प्रवास आणि संघर्ष
रेखा गुप्ता यांनी १९९४-९५ मध्ये दौलतराम महाविद्यालयाच्या सचिवपदापासून राजकीय प्रवासाला सुरुवात केली. त्या १९९६-९७ मध्ये दिल्ली विद्यापीठाच्या छात्रसंघाच्या अध्यक्ष पदावर निवडून आल्या. भाजपमध्ये विविध जबाबदाऱ्या सांभाळत २००७ मध्ये उत्तरी पीतमपुरा वार्डमधून नगरसेविका झाल्या. त्यानंतर महिला कल्याण आणि बालविकास समितीच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळली. २०१० मध्ये भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये प्रवेश मिळवताना भाजप महिला मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड झाली. २०१५ आणि २०२० च्या विधानसभा निवडणुकीत पराभव पत्करावा लागला असला तरी, यंदा मोठ्या मताधिक्याने त्यांचा विजय झाला.
उपमुख्यमंत्री परवेश वर्मा आणि नव्या मंत्रिमंडळात समतोल प्रतिनिधित्व
दिल्लीच्या उपमुख्यमंत्रीपदी परवेश वर्मा यांची निवड करण्यात आली असून, ते दिल्लीचे माजी मुख्यमंत्री साहिब सिंह वर्मा यांचे पुत्र आहेत. भाजपने दिल्ली आणि हरयाणातील जाट समाजाचा विश्वास संपादन करण्यासाठी त्यांना ही संधी दिली आहे. त्यांनी नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघातून आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांचा पराभव केला आहे. मंत्रिमंडळात जाट, पंजाबी आणि पूर्वांचल समुदायाचे संतुलन ठेवत आशीष सूद, मनजिंदर सिंह सिरसा, रविंद्र सिंह इंद्राज, कपिल मिश्रा आणि पंकज सिंह या नेत्यांना संधी देण्यात आली आहे. लवकरच मंत्र्यांचे खातेवाटप जाहीर होणार असून, दिल्लीच्या नव्या सरकारकडून आगामी वाटचालीबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.