मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मुक्ताईनगर तालुक्यातील संजय गांधी योजनेतील लाभार्थ्यांचे मागील दोन महिन्यांचे अनुदान एक महिन्यापासून तालुका प्रशासनाकडे जमा झालेले असून एक महिन्याचा कालावधी उलटल्यानंतरही तालुका प्रशासनाने लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केले नसल्याने निराधार, विधवा, दिव्यांग, वयोवृद्ध लाभार्थ्यांमध्ये तालुका प्रशासनाविरुद्ध तीव्र नाराजी व असंतोष असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. विवेक सोनवणे यांनी पत्रकार परिषदेत म्हटले आहे.
पूर्णा नदीपात्रातून रात्रंदिवस २४ तास अवैध गाळ उत्खनन करणाऱ्यांना संरक्षण देण्यात तालुका प्रशासनाला वेळ मिळाला नाही की काय असा संतप्त सवाल तालुक्यातून विचारला जात आहे. याबाबत संबंधित अधिकारी तसेच तहसीलदार यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी संजय गांधी योजनेतील लाभार्थ्यांची रक्कम कधी किती आली ? याबाबत कोणतीही माहिती दिली नाही.
त्यामुळे डॉ. विवेक सोनवणे यांनी जिल्हा प्रशासनाकडे दूरध्वनीवरून तक्रार केली असता त्यांनी लाभार्थ्यांची रक्कम तात्काळ त्यांच्या खात्यात जमा करण्याचे आदेश तालुका प्रशासनाला दिले असल्याचे सांगितले. मुक्ताईनगर तालुका प्रशासनाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला असून याची तक्रार स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. विवेक सोनवणे यांनी जिल्हा प्रशासनाकडे केलेली असून सांगायो लाभार्थ्यांना किती दिवसात अनुदान मिळणार याकडे तालुका वासियांचे लक्ष लागलेले आहे.