Home क्राईम आचारसंहिता संपूनही शस्त्र परत करण्यास नकार ; माजी पालकमंत्र्यांचा आरोप

आचारसंहिता संपूनही शस्त्र परत करण्यास नकार ; माजी पालकमंत्र्यांचा आरोप


पारोळा -लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । नगरपालिका निवडणुकीची आचारसंहिता संपून तब्बल दोन महिने उलटूनही जमा केलेले परवाना धारक शस्त्र परत देण्यास पारोळा येथील पोलीस निरीक्षकांनी नकार दिल्याचा गंभीर आरोप माजी पालकमंत्री डॉ. सतीश पाटील यांनी केला आहे. या प्रकाराविरोधात त्यांनी थेट जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेत अधिकृत तक्रार दाखल केली असून या प्रकरणामुळे जिल्ह्यात राजकीय व प्रशासकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

डॉ. सतीश पाटील यांनी जिल्हाधिकारी रोहन घुगे आणि पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांची भेट घेऊन आपली बाजू मांडली. आचारसंहिता लागू असताना कायद्यानुसार शस्त्र जमा करण्यात आले होते; मात्र आचारसंहिता संपल्यानंतरही ते परत देण्यात आले नाही, अशी तक्रार त्यांनी केली. जिल्हाधिकाऱ्यांनी शस्त्र जमा ठेवण्याबाबत कोणतेही नवीन आदेश दिले नसल्याचे स्पष्ट केल्याचेही पाटील यांनी सांगितले.

डॉ. पाटील यांनी पारोळा पोलीस निरीक्षकांवर राजकीय पक्षपाताचा आरोप करत, “दोन महिन्यांपासून आचारसंहिता संपली आहे. माझे शस्त्र परत मिळावे यासाठी विचारणा केली असता जिल्हा परिषद निवडणुकीचे कारण पुढे केले जात आहे. निवडणूक कधी होईल हे निश्चित नसताना शस्त्र रोखून ठेवणे योग्य नाही,” असे म्हटले. त्यांनी हा निर्णय राजकीय सूडबुद्धीतून घेतल्याचा आरोपही केला.

पुढे बोलताना त्यांनी पूर्वी त्यांच्या घरावर झालेल्या दरोड्याच्या घटनेचा उल्लेख करत, त्या वेळी शस्त्रामुळे कुटुंबियांचे प्राण वाचल्याचा दावा केला. “जर आमच्या जीवितास काही बरेवाईट झाले, तर त्याची जबाबदारी संबंधित अधिकारी घेणार का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. पारोळा पोलीस निरीक्षकांनी गेल्या काही महिन्यांपासून विविध प्रकरणांत पक्षपाती भूमिका घेतल्याचा आरोप करत त्यांनी या संदर्भातील मुद्दे जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांसमोर मांडले.

दरम्यान, या प्रकरणाची चौकशी करून कायदेशीर तरतुदीनुसार निर्णय घेण्यात येईल, असे सूत्रांनी सांगितले. प्रशासकीय पातळीवर याबाबत अहवाल मागविण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. संबंधित पोलीस निरीक्षकांची भूमिका जाणून घेण्याचा प्रयत्न सुरू असून अधिकृत स्पष्टीकरण अद्याप समोर आलेले नाही.


Protected Content

Play sound