नवी दिल्ली, वृत्तसेवा | आंतरराष्ट्रीय बाजारात गॅसच्या दरात घट झाली आहे. यामुळे देशात घरगुती विनाअनुदानित गॅसच्या दरात ६२.५० रुपयांनी कपात करण्यात आली आहे.
वर्षाला १२ अनुदानित सिलेंडर्सचा कोटा संपल्यानंतर ग्राहकांना हा विनाअनुदानित गॅस घ्यावा लागतो. मात्र, ज्या ग्राहकांचा हा कोटा शिल्लक आहे अशांनाही याचा फायदा मिळणार आहे. त्यामुळे या नव्या दरांमुळे १४.२ किलोच्या अनुदानित गॅसचा दर आता ५७४.५० रुपये इतका असणार आहे. बुधवारी मध्यरात्रीपासूनच हा नवा दर लागू झाला आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने याबाबत माहिती दिली आहे.गेल्या महिन्यात सरकारने विनाअनुदानित घरगुती गॅसच्या दरात १००.५० रुपयांनी मोठी कपात करण्यात केली होती. त्यानंतर आता ऑगस्ट महिन्याच्या पहिल्याच दिवशी ६२.५० रुपयांची कपात झाल्याने सुमारे एका महिन्यांत गॅसचे दर हे १६३ रुपयांनी कमी झाले आहेत. त्यामुळे हा गृहिणींसाठी मोठा दिलासा आहे. दरम्यान, घरगुती सिलेंडरच्या नव्या दराप्रमाणे प्रत्येक सिलेंडरसाठी ग्राहकाला आपल्या बँक खात्यात १४२.६५ रुपयांचे अनुदान मिळेल.