जळगाव -लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । रेडक्रॉसतर्फे “मनाला आवर घालूया” या मानसिक स्वास्थ्य जागरूकता करणाऱ्या विषयावर डॉ. यशश्री विसपुते यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी या व्याख्यानाचा जास्तीत जास्त जळगावकरांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

सध्याच्या आधुनिक काळात आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी होत असलेली धावपळ, नात्यांमधील सुसंवादाचा अभाव, मोबाईलचा अतिवापर यामुळे प्रत्येक व्यक्ती शारीरिक आजारांसोबत मानसिक व्याधींनी ही ग्रसित होत आहे. यासाठी गरज आहे ती आपल्याला मानसिक स्थिती समजून घेण्याची. याच उद्देश्याने इंडियन रेडक्रॉस सोसायटी जळगाव शाखेमार्फत प्रसिद्ध सल्लागार मानसोपचार तज्ज्ञ आणि “पीसफुल माईंड क्लिनिक” च्या संस्थापिका डॉ. यशश्री विसपुते यांच्याशी सुसंवाद व्याख्यानाचे आयोजन सोमवारी ( ६ ऑक्टोबर) रोजी सायंकाळी ६ वाजता रेडक्रॉस भवन सभागृहात आयोजित करण्यात आले आहे.

डॉ. यशश्री विसपुते या भारतभर व भारताबाहेर देखील मानसोपचार सल्ला देतात. या क्षेत्रात त्यांना १० वर्षांपेक्षा अधिक काळाचा रुग्णसेवेचा अनुभव असून त्यांनी कुपर हॉस्पिटल जुहू, भाभा ऑटोमॅटिक रिसर्च सेंटर मुंबई, सेंट्रल जेल हॉस्पिटल तिहार, सेंट डिफेन्स हॉस्पिटल दिल्ली अशा विविध नामांकित हॉस्पिटलमध्ये काम केले आहे.
विविध प्रकारच्या पदार्थांचे सेवन, स्क्रीन ॲडिक्शन, पॉर्न ॲडिक्शन यासारख्या वर्तणुकीशी संबंधित व्यसनाधीन रुग्णांचे व्यवस्थापन करण्यात त्यांना विशेष कौशल्य आहे.
तरी डॉ. यशश्री विसपुते यांच्या सुसंवाद मार्गदर्शनाचा लाभ जळगावकर नागरिकांनी अवश्य घ्यावा असे आवाहन रेडक्रॉस जळगाव जिल्हा शाखेतर्फे करण्यात येत आहे



