गुरूग्राम-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | हरियाणात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपनं बुधवारी ६७ उमेदवारांची यादी जाहीर केली. यानंतर भाजपला नेत्यांच्या नाराजीचा सामना करावा लागला. गेल्या २४ तासांत २० नेत्यांनी पक्षाला रामराम ठोकला. त्यांची नाराजी पक्षाला येत्या निवडणुकीत महागात पडण्याची शक्यता आहे. काही नेत्यांनी तर अपक्ष निवडणूक लढवण्याची घोषणा केली. पक्ष सोडणा-यांच्या यादीत ऊर्जा मंत्री रणजीतसिंह चौटाला, आमदार लक्ष्मण दास नापा यांच्यासह अनेकांचा समावेश आहे.
रतियाचे आमदार लक्ष्मण नापा यांनी तिकीट न मिळाल्याने भाजपला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला. पक्षाने येथून माजी खासदार सुनीता डुग्गल यांना तिकीट दिले. तसेच हरियाणा भाजप ओबीसी मोर्चाचे राज्य अध्यक्ष आणि माजी मंत्री करणदेव कंबोज यांनी उमेदवारी न मिळाल्याने राजीनामा दिला तर विकास उर्फ बल्ले-दादरी किसान मोर्चाच्या जिल्हाध्यक्षांनीही राजीनामास्त्र उगारले. भाजप युवा राज्य कार्यकारिणी सदस्य अमित जैन यांनी सोनिपत विधानसभा निवडणुकीचे प्रभारीपद सोडले.
शमशेर गिल यांनी उकलाना मतदारसंघातून तिकीट न मिळाल्याने राजीनामा दिला. हरियाणा भाजप शेतकरी मोर्चाचे सुखविंदर मंडी यांनीही राजीनामा दिला. हिसारमधील भाजप नेते दर्शनगिरी महाराज, सीमा गॅबिपूर, आदित्य चौटाला, आशू शेरा, सविता जिंदल, तरुण जैन, नवीन गोयल, डॉ. सतीश खोला यांनीही तिकीट न मिळाल्याने राजीनामा दिला. यासोबतच बचनसिंह आर्य, रणजित चौटाला, विश्वंभर वाल्मिकी, पंडित जी. एल. शर्मा, प्रशांत सनी यादव यांनीही राजीनामा दिला.