मुंबई–वृत्तसेवा । महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपण्यास अवघे काही तास शिल्लक असतानाच महायुतीतील नेत्यांची चिंता वाढली आहे. विशेषतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत मोठ्या प्रमाणावर बंडखोरी उफाळून आली असून, मुंबईत तब्बल ३५ ते ४० ठिकाणी बंडखोर उमेदवार मैदानात कायम असल्याची माहिती आहे. प्रत्येक बंडखोर आपला विजय निश्चित असल्याचा दावा करत असल्याने महायुतीसमोर मोठे राजकीय आव्हान उभे राहिले आहे.
अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस असतानाही महायुतीतील अनेक उमेदवारांनी अद्याप माघार घेतलेली नाही. शिंदे गटातील अनेक पदाधिकारी आणि इच्छुक उमेदवारांनीही अर्ज कायम ठेवत ‘माघार नाही’ अशी ठाम भूमिका घेतल्याचे समजते. या पार्श्वभूमीवर बंडखोरांना समजावून सांगण्यासाठी वरिष्ठ नेत्यांची फळी कामाला लागली असून, तडजोडीचे प्रयत्न वेगाने सुरू आहेत. तरीही परिस्थिती नियंत्रणात येईल की नाही, याबाबत साशंकता कायम आहे.

दरम्यान, गोरेगाव-दिंडोशी विधानसभा मतदारसंघात शिंदे गटाला मोठा धक्का बसल्याची बातमी समोर आली आहे. गोरेगाव आणि दिंडोशी विधानसभा विभाग प्रमुख गणेश शिंदे यांनी पक्षातील असंतोष उघडपणे व्यक्त करत विभागप्रमुखांसह सुमारे २०० पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सामूहिक राजीनामे दिल्याचे स्पष्ट केले आहे. गणेश शिंदे यांची कन्या श्रेया शिंदे हिने अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला असून, तो अर्ज मागे न घेण्यावर कुटुंब ठाम असल्याचे सांगण्यात येत आहे.
गोरेगाव हिंदूश्री विभागातील शाखा प्रमुख, गटप्रमुख तसेच अनेक प्रमुख पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिल्याने शिंदे गटाची स्थानिक संघटनात्मक ताकद कमकुवत झाल्याचे चित्र आहे. महापालिका निवडणुकीआधीच हा धक्का बसल्याने गोरेगाव-दिंडोशी परिसरात राजकीय हालचालींना वेग आला आहे.
या भागात उमेदवारी वाटपावरून नाराजी शिगेला पोहोचल्याचे सांगितले जात आहे. दोन्ही प्रभागांत तयारी असतानाही एक जागा भाजपला आणि एक जागा शिवसेनेला देण्यात आल्याने, तसेच प्रभाग ५४ शिंदे गटाकडे असतानाही विधानसभा मतदारसंघ भाजपकडे सोपवल्यामुळे स्थानिक शिवसैनिकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला. नव्याने आलेल्या पदाधिकाऱ्यांना संधी देऊन जुने कार्यकर्ते डावलल्याचा आरोपही करण्यात येत आहे.
या पार्श्वभूमीवर महिला उपविभाग प्रमुख सोनल हडकर, शाखा समन्वयक आणि इतर अनेक पदाधिकाऱ्यांनी गणेश शिंदे यांच्या पाठोपाठ सामूहिक राजीनामे सादर केले. त्यामुळे मुंबई महापालिका निवडणुकीआधीच शिंदे गटातील अंतर्गत नाराजी उघडपणे समोर आली असून, महायुतीच्या रणनीतीवर त्याचा थेट परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
एकूणच, अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या टप्प्यात महायुतीत विशेषतः शिंदे गटात बंडखोरीचा भडका उडाल्याचे स्पष्ट दिसत असून, ही धाकधूक निवडणूक रणांगणात काय रंग दाखवते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



