मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राज्य सरकारच्या विविध विभागातील ५२४ रिक्त पदे भरण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणारी राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा ( २०२४) २५ ऑगस्ट रोजी घेण्यात येणार आहे. राज्य लोकसेवा आयोगातर्फे नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा-२०२४ साठी २९ डिसेंबर २०२३ रोजी २७४ रिक्त पदांकरीता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. या जाहिरातीनुसार सदर परीक्षा २८ एप्रिल घेण्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र दरम्यानच्या काळात सरकारने मराठा समाजासाठी १० टक्के आरक्षण लागू करण्याचा कायदा फेब्रुवारी महिन्यात केला.
तसेच या कायद्यानुसार शासकीय सेवेतील विविध पदांवरील नियुक्तीकरीता सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाचे आरक्षण लागू करण्याचे आदेश देण्यात आले. त्यानुसार आयोगाने नव्या आरक्षणाप्रमाणे जागा निश्चिती करुन प्रस्ताव पाठविण्याची सूचना राज्य सरकारला केली होती. तसेच २१ मार्चच्या सूचनेनुसार २८ एप्रिल रोजी होणारी परीक्षा पुढे ढकलली होती. राज्य सरकारने आता सुधारित ५२४ पदांचा प्रस्ताव आयोगाला पाठविला असून त्यानुसार ही पदे भरण्यासाठी २५ ऑगस्ट रोजी परीक्षा घेण्यात येणार असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे. या परीक्षेसाठी आयोगाने आता महत्त्वाच्या सूचना जाहीर केल्या आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत रविवार २५ ऑगस्ट २०२४ रोजी नियोजित महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ करीता प्रवेश दिलेल्या उमेदवारांची प्रवेश प्रमाणपत्रे आयोगाच्या https://mpsconline.gov.in संकेतस्थळावरील प्रवेशपात्र उमेदवारांच्या खात्यामध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे.
या सूचनांकडे दुर्लक्ष करू नका
१. प्रवेश प्रमाणपत्र सोबत आणणे अनिवार्य आहे. त्याशिवाय परीक्षेस प्रवेश दिला जाणार नाही.
२. परीक्षेच्या दिवशी ऐनवेळी उद्भवू शकणाऱ्या अडचणी अथवा आंदोलने, मोचे, वाहतूक समस्या, अतिवृष्टी इत्यादी बाबी लक्षात घेऊन, परीक्षा सुरू होण्याच्या वेळेपूर्वी किमान दीड तास अगोदर ३. संबंधित परीक्षा उपकेंद्रावर उपस्थित राहणे आवश्यक आहे.
४. प्रत्यक्ष परीक्षा सुरू होण्याच्या वेळेपूर्वी एक तास अगोदर परीक्षा कक्षातील स्वतः च्या बैठक क्रमांकावर उपस्थित राहणे अनिवार्य आहे.
५. परीक्षा कक्षातील अंतिम प्रवेशासाठी विहित केलेल्या वेळेनंतर कोणत्याही परिस्थितीत उमेदवारांना परीक्षा कक्षामध्ये प्रवेश दिला जाणार नाही.
अथवा यासंदर्भात आयोगाची कोणत्याही प्रकारची जबाबदारी राहणार नाही.
६. आयोगाच्या संकेतस्थळावरील उमेदवारांना सर्वसाधारण सूचना, प्रवेश प्रमाणपत्रावरील सूचना तसेच आयोगाच्या संकेतस्थळावरील सूचना उपलब्ध आहेत.
७. आयोगाकडून वेळोवेळी देण्यात आलेल्या सूचनांचे उल्लंघन करणाऱ्या उमेदवारांवर आयोगाच्या स्वेच्छाधिकारानुसार ठराविक कालावधीसाठी अथवा कायमस्वरुपी प्रतिरोधनाची तसेच, प्रचलित नियम / कायद्यातील तरतुदीनुसार कारवाई करण्यात येईल.
७. प्रवेश प्रमाणपत्र मिळविण्यात कोणतीही अडचण उद्भवल्यास उमेदवारास आयोगाकडे संपर्क करता येणार आहे.