Home Cities अमळनेर रवींद्र मोरे यांना राज्यस्तरीय ‘ज्ञानवंत पत्रकार पुरस्कार’ जाहीर 

रवींद्र मोरे यांना राज्यस्तरीय ‘ज्ञानवंत पत्रकार पुरस्कार’ जाहीर 


अमळनेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय आणि समाजाभिमुख कार्याची दखल घेत ‘महादर्पण’चे मुख्य संपादक रवींद्र मोरे यांना राज्यस्तरीय ‘ज्ञानवंत पत्रकार पुरस्कार’ जाहीर करण्यात आला आहे. ‘सकल ज्ञान महोत्सव सन्मान व बक्षीस वितरण सोहळा २०२६’ या प्रतिष्ठित कार्यक्रमात त्यांचा सन्मान करण्यात येणार असून, रविवार, १५ फेब्रुवारी रोजी जळगाव येथे हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.

जनमत प्रतिष्ठान व मुक्ताई महिला बहुउद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेला हा भव्य सोहळा अल्पबचत भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे रविवार, दि. १५ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ९ वाजता पार पडणार आहे. विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार असून, जिल्ह्यातील सामाजिक, शैक्षणिक व पत्रकारिता क्षेत्रातील व्यक्तींची मोठी उपस्थिती अपेक्षित आहे.

या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून माजी डायट प्राचार्य निलकंठ आप्पा गायकवाड मार्गदर्शन करणार आहेत. अध्यक्षस्थानी जळगावचे आमदार राजुमामा भोळे, नवनिर्वाचित महापौर दिपमाला काळे तसेच माजी महापौर जयश्री महाजन यांची उपस्थिती राहणार आहे. मान्यवरांच्या उपस्थितीत होणाऱ्या या सोहळ्यामुळे कार्यक्रमाचे महत्त्व अधिक अधोरेखित झाले आहे.

रवींद्र मोरे यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील विविध प्रश्नांवर सातत्याने प्रकाश टाकत पत्रकारितेचे सामाजिक भान जपले आहे. सामाजिक, राजकीय उपक्रम, प्रशासनातील घडामोडी तसेच सर्वसामान्यांच्या समस्या यांवर त्यांनी अभ्यासपूर्ण आणि निर्भीड लेखन केले आहे. सत्य, निष्पक्षता आणि जनहितासाठी कटिबद्ध असलेल्या त्यांच्या कार्याची दखल घेत आयोजक संस्थांनी त्यांना या राज्यस्तरीय सन्मानासाठी निवडले आहे.

या पुरस्काराच्या घोषणेनंतर जळगाव जिल्ह्यातील पत्रकार आणि विचारवंत वर्गात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. आयोजक जनमत प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंकज नाले व मुक्ताई महिला बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा सौ. निताताई मंगलसिंग सोनवणे यांनी मोरे यांच्या कार्याचे कौतुक करत, “हा सन्मान त्यांच्या माध्यमातून सत्यनिष्ठ पत्रकारितेला मिळणारा आदर आहे,” अशी भावना व्यक्त केली आहे. या सन्मानामुळे जिल्ह्यातील पत्रकारितेला नवे बळ मिळणार असल्याचेही मत व्यक्त होत आहे.


Protected Content

Play sound