रविकांत तुपकर यांच्या आंदोलनापूर्वी राज्यभरात कार्यकर्त्यांची धरपकड

बुलडाणा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी उद्या, १९ मार्च रोजी मुंबईतील नरिमन पॉइंट येथे नियोजित आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात मोठ्या प्रमाणावर धरपकड सुरू झाली आहे. क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या या आंदोलनासाठी कार्यकर्ते मुंबईकडे रवाना होत असतानाच, पोलिसांनी त्यांना स्थानबद्ध करण्यास सुरुवात केली.

बुलढाण्यासह अनेक जिल्ह्यांमध्ये संघटनेच्या कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली असून, परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिस प्रशासन सतर्क झाले आहे. विशेष म्हणजे, आंदोलनाचे प्रमुख नेते रविकांत तुपकर सध्या संपर्काबाहेर असल्याने या प्रकरणाला अधिक गांभीर्य प्राप्त झाले आहे.

तुपकर यांनी कोणत्याही परिस्थितीत आंदोलन होणारच असल्याची भूमिका घेतली असून, त्यांच्या ठावठिकाण्याबाबत स्पष्ट माहिती मिळू शकलेली नाही. पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर सुरक्षाव्यवस्था तैनात केली असून, उद्या आंदोलन रोखण्यासाठी प्रशासन सज्ज आहे.

या आंदोलनात शेतकरी समुद्रात कापूस आणि सोयाबीन टाकून सरकारच्या धोरणांचा निषेध करणार आहेत. मात्र, आधीच कार्यकर्त्यांना अटक झाल्यामुळे हे आंदोलन कशा पद्धतीने होणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

Protected Content